डोंबिवली- डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून उपचार घेऊन औषधोपचार घेऊन घरी पायी चाललेल्या एका ५२ वर्षाच्या महिला रुग्णाला पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट हॉटेल चौकात लुटणाऱ्या दोन जणांना टिटवाळा जवळील बनेली गावातून कौशल्याने तपास करुन विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपींचा शोध घेण्यासाठी विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल आंधळे, कुलदीप मोरे यांचे तपास पथक तयार केले होते. लुटीची घटना घडलेल्या सम्राट हाॅटेल चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून त्या आधारे पोलिसांनी डोंबिवली, कल्याण, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील एकूण ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण महिनाभरात तपासले. या चित्रीकरण तपासातून पोलिसांनी टिटवाळा जवळील बनेली गावातून दोन चोरट्यांना अटक केली. ते सराईत चोरटे आहेत.

हेही वाचा >>> प्रभातफेरी पडली महागात ; भल्या पहाटे सोनसाखळी पळवली

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले, गेल्या महिन्यात डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी भागातील माऊली रुग्णालया जवळील व्दारका समृध्दी सोसायटीत राहणाऱ्या यशोदा भानुशाली आजारी असल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या कोपर येथील शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्या होत्या. उपचार घेऊन त्या पायी घरी चालल्या होत्या. यशोदा यांच्या गळ्यात सोन्याची कंठी आणि हातातील बटव्यात रोख रक्कम होती. दोन भामट्यांनी यशोदा यांना दिनदयाळ रस्ता येथे सम्राट हाॅटेल चौकात गाठले. यशोदा यांना ‘आमचे प्रकाश शेठ म्हात्रे गरीबांना अकराशे रुपये आणि साडी वाटप करत आहेत. आम्ही प्रकाश शेठ यांचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही आमच्या बरोबर आलात तर तुम्हाला आम्ही दोन साड्या आणि अकराशे रुपये झटपट मिळवून देऊ’ असे बोलण्यात गुंतवून त्यांना संमोहित करुन यशोदा यांच्या गळ्यातील सोन्याची कंठी, बटव्यातील पैसे काढून भामट्यांनी पळ काढला.

यशोदा घरी गेल्या भानावर आल्यानंतर त्यांना गळ्यात सोन्याची कंठी, हातामधील पैशाचा बटवा गायब असल्याचे दिसले. वाटेत भेटलेल्या भुरट्या चोरांनी ऐवज लुटून नेल्याचा दाट संशय आल्याने यशोदा यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला होता.

विशेष तपास पथकाने सम्राट चौकातील लुटीचा प्रकार घडलेल्या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून आरोपींची ओळख पटविण्यास सुरुवात केली. त्यांनी चौकात आरोपी कोणत्या भागातून आले हे तपासण्यासाठी दिनदयाळ रस्ता, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील एकूण ६० सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यांना चित्रीकरणात आरोपी कल्याण, टिटवाळा भागातून आल्याचे दिसत होते. तपास पथकाने टिटवाळा भागात जाऊन तेथील स्थानिक रहिवासी, रिक्षा चालक यांना चित्रीकरणात दिसणाऱे आरोपी दाखविले. त्यावेळी मिळालेल्या माहितीमधून आरोपी हे टिटवाळा बनेली गावातील रहिवासी आणि सराईत चोरटे आहेत अशी माहिती मिळाली.

आरोपींचे मोबाईल शोधून पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सोमवारी रात्री टिटवाळा बनेली गावात छापा मारुन कट्टु गणेश पवार (३५), राजेश शशिराव पवार (२७, रा. पवार बंगल्या जवळ, शाहू यांची खोली, बनेली गाव, टिटवाळा) यांना अटक केली.

कट्टू, राजेश यांची पोलीस ठाण्यात चौकशी करताच त्यांनी आपण मानपाडा, विष्णुनगर हद्दीत एकूण सहा भुरट्या चोऱ्या केल्या आहेत अशी माहिती दिली. सम्राट चौकातील महिलेला फसविण्याचा प्रकार आम्हीच केला होता अशी कबुली चोरट्यांनी पोलिसांना दिली. चोरलेला ऐवज जप्त करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही आरोपींची चौकशी सुरू केली आहे. चोरलेला ऐवज ते कोणाला विकत होते. त्यांनाही पोलीस ताब्यात घेणार आहेत. या तपास पथकात साहाय्यक उपनिरीक्षक शशिकांत नाईकरे, हवालदार रवींद्र पाटणकर, शकील जमादार, संतोष कुरणे, भगवान सांगळे, तुळशीराम लोखंडे, शकील तडवी, कुंदन भामरे यांचा सहभाग होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two men who robbed the 52 year old female patient arrested near titwala zws
First published on: 18-08-2022 at 16:33 IST