सुशांत मोरे

पुनर्वसन, भूसंपादनाच्या प्रक्रि येमुळे प्रकल्पास विलंब; प्रकल्पातील दिघा रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी वर्ष लागणार

कल्याणहून थेट नवी मुंबईला जाणारा आणि ठाणे स्थानकातील भार हलका करण्यास मदत करणाऱ्या कळवा ते ऐरोली उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पाची अजूनही रखडपट्टीच सुरू आहे. पुनर्वसन, भूसंपादन प्रक्रि येस लागणारा विलंब या कारणांमुळे हा प्रकल्प रेंगाळला असून तो पूर्ण होण्यास किमान दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.

ठाणे स्थानकातून ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी व कल्याणच्या दिशेने जाणाऱ्याही लोकल सुटतात. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाडय़ांनाही थांबा आहे. त्यामुळे ठाणे स्थानकात मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याशिवाय कल्याणहून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनाही ठाणे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल पकडण्याशिवाय पर्याय नसतो.

ठाणे स्थानकातील प्रवाशांचा भार हलका होण्यासाठी व कल्याण रेल्वेमार्ग नवी मुंबईला जोडण्यासाठी कळवा ते ऐरोली उन्नत रेल्वे मार्ग तयार करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घेतला. या प्रकल्पाचा समावेश असलेल्या ‘एमयूटीपी-३’ योजनेला डिसेंबर २०१६ मध्ये मंजुरी मिळाली; परंतु साडेतीन किमीच्या या मार्गिकेच्या उभारणीचे कंत्राट देण्यासाठी २०१८ हे वर्ष उजाडावे लागले.

सध्या प्रकल्पातील फक्त दिघा स्थानकाचेच काम सुरू असून, अन्य कु ठल्याही कामांना मुहूर्त मिळालेला नाही. दिघा स्थानकातीलही फक्त दोन तिकीट खिडक्या, संरक्षक भिंत, दोन प्रसाधनगृहे, संरक्षक भिंत व अन्य किरकोळ कामेच पूर्ण होत असून महत्त्वाची कामेही मार्गी लागलेली नाहीत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उन्नत मार्गिके त मुकु ंद आरयूबी, पारसिक बोगदा व कळवाजवळ काही झोपडय़ा असून यातील एक हजार ६० जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. त्यासाठी विलंब लागला. पुनर्वसनासाठी ९२४ गाळे भाईंदरपाडा येथे उपलब्ध केले असून उर्वरितांचा प्रश्नही सुटत आहे. ज्यांना गाळे उपलब्ध केले आहेत, त्यांचे सध्या करोनामुळेही स्थलांतर होऊ शकलेले नाही.

मार्गिका कशी?

* एकूण साडेतीन किलोमीटर रेल्वे मार्गिकेत २.२० किलोमीटरची मार्गिका ही उन्नत असेल व नंतरची मार्गिका समांतर असेल. कळवा स्थानकालगतच उन्नत मार्ग सुरू होऊन मुकुंद रोड अंडर ब्रिज (आरयूबी)पर्यंत जाईल (विटावानंतर) आणि नंतर खाली उतरून सध्याच्या ट्रान्स हार्बर लोकल मार्गिके ला जोडली जाईल. कळवा ते ऐरोली मार्गात दिघा हे नवीन स्थानक येत असून त्यापुढे ऐरोली स्थानक असेल.

* कल्याणहून कळवामार्गे ऐरोली, वाशी, पनवेलला थेट लोकलने जाणे शक्य होईल. त्यासाठी उन्नत मार्ग कळवा मुख्य मार्गाला जोडला जाणार आहे. कल्याण व्हाया कळवा ऐरोलीसाठीही दर दहा ते पंधरा मिनिटांनी लोकल उपलब्ध होऊ शकते.

कळवा स्थानकही उन्नत

मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील कळवा स्थानकाबरोबरच उन्नत मार्गात कळवा उन्नत स्थानक प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. सध्याच्या कळवा स्थानकातील सीएसएमटी दिशेला असलेल्या पादचारी पुलाला लागूनच उन्नत स्थानक बनेल. येथील पूल नवीन उन्नत स्थानकाला जोडला जाईल.

प्रकल्पाचा खर्च

मार्गिका उभारणी ४७६ कोटी रुपये

दिघा स्थानक उभारणी   ११५ कोटी रुपये

कळवा ते ऐरोली उन्नत प्रकल्पात काहींचे पुनर्वसन होणार आहे. याशिवाय भूसंपादनही होणे गरजेचे असून या दोन्ही कामांची प्रक्रि या सुरू आहे. ही महत्त्वाची कामे पार पाडल्यास उन्नत मार्गिके च्या कामाला गती दिली जाईल.

– रवी शंकर खुराना, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी