कल्याण : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासाठी चित्रफित तयार करणाऱ्या नाशिक येथील दोन तरूणांना रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (२०), रितेश हिरालाल जाधव (१८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत. गेल्या दहा दिवसापूर्वी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये बेकायदा घुसून आरोपी राजा आणि रितेश यांनी एक चित्रफित तयार केली होती. या चित्रफितीमध्ये ते मोटरमन असल्यासारखे आणि तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. ही चित्रफित या तरूणांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून ही चित्रफित तयार करण्यात आल्याने रेल्वेच्या सायबर सुरक्षा विभागाने समाज माध्यमांतील या चित्रफितीच्या अनुषंगाने आरोपींचा तपास सुरू केला होता. हेही वाचा.निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांची खासगी यंत्रणा – राजन विचारे रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही चित्रण, इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी या दोन्ही तरूणांची ओळख पटवली. ते नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजले. रेल्वे सुरक्षा बळ आणि स्थानिक पोलिसांनी नाशिकमध्ये या तरूणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. हे दोन्ही तरूण नाशिकमधून अटक केले. हेही वाचा.ठाण्यात दोन्ही शिवसेनेत पोस्टर वॉर, उबाठाच्या पोस्टरला शिंदे सेनेकडून पोस्टरने उत्तर या तरूणांनी कसारा रेल्वे स्थानकातील कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून बेकायदा चित्रफित तयार केल्याची कबुली रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिली. पोलिसांनी त्यांच्या दोषारोप ठेऊन त्यांना अटक केली. असाच प्रकार यापूर्वी गुलजार शेख याने करून रेल्वे रुळाशी छेडछाड केली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे. रेल्वेच्या आवारात, लोकलमध्ये कोणीही गैरकृत्य करत असेल तर त्याने १३९ किंवा ९००४४१०७३५ वर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा जवानांनी केले आहे.