लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील आयरे भागात अधिनारायण धोकादायक इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे आपत्कालीन बचाव पथकांनी जाहीर केले. शुक्रवारी संध्याकाळी ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली तीन जण गाडले गेले होते. एका महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात आपत्कालीन पथकांना यश आले.




सुनील लोढाया (५८), अरविंद भाटकर (७०) अशी इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या रहिवाशांची नावे आहेत. सुनील यांची पत्नी दीप्ती लोढाया (५४) यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. या महिलेवर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
४० वर्षापूर्वीच्या या धोकादायक इमारतीत ४० कुटुंबं राहत होती. ही इमारत अतिधोकादायक झाल्याने ३६ कुटुंबे यापूर्वीच घरे सोडून इतरत्र राहण्यास गेली होती. गुरुवारपासून ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, अतिक्रमण नियंत्रक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी या इमारतींमधील निवास करुन असलेल्या रहिवाशांना सदनिका खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. शुक्रवारी सकाळपासून या इमारतीमधील भाडेकरु, मूळ रहिवाशांना सदनिकेतून बाहेर काढण्याचे काम पालिकेने सुरू केले होते. मयत भाटकर हे बिछान्याला खिळून होते. ते घराबाहेर पडण्यास तयार नव्हते. तसेच लोढाया दाम्पत्य घर सोडण्यास तयार नव्हते. त्यांना बाहेर काढण्याची तयारी प्रशासन करत असताना शुक्रवारी संध्याकाळी ही धोकादायक इमारत कोसळली.कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन विभाग, ठाणे आपत्ती बचाव पथकाने ढिगारा उपसण्याचे काम पहाटेपर्यंत केले. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यावेळी उपस्थित होते.