शहापूर : आसनगाव येथील भारंगी नदीत तरुण बुडाल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी पुन्हा एकदा ९० वर्षीय वृद्धाचे भारंगी नदीत बुडून मृत्यू झाला. तर, दुसरीकडे माहुली किल्याच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्याच्या डोहात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या दोघांचे शोधकार्य सुरू आहे. परंतू, याप्रकारमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आसनगाव येथील भारंगी नदीत तरुण बुडल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी शहापुरातील भारंगी नदीत एक ९० वर्षीय वृद्ध बुडाला. तर, माहुली किल्याच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्या खालच्या डोहात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना देखील उघडकीस आली आहे. गेल्या तीन दिवसात पाण्यात बुडल्याच्या तीन घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारंगी नदीत बुडालेल्या दोघांचे शोधकार्य सुरू आहे.
कल्याण येथील सार्थक कोळी हा १७ वर्षीय तरुण बुधवारी डिप्लोमाच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आला होता. मात्र, प्रवेश प्रक्रियेसाठी अवधी असल्याने आसनगाव येथील भारंगी नदीत मित्रांसह पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज आला नसल्याने सार्थक पाण्यात बुडाला. जीव रक्षक टीम, अग्निशमन दलाचे व एनडीआरएफ चे जवानांनी भारंगी नदीच्या पाण्यात सार्थक चा शोध घेतला. परंतू, अद्याप त्याचा शोध लागला नाही. सार्थकचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी शहापुर जवळील कळंभे येथील ९० वर्षीय वृद्ध दत्तात्रय रोकडे हे शहापुरच्या खालच्या नाक्यावरील भारंगी नदीत बुडाले असून त्यांचाही जीव रक्षक टीम च्या माध्यमातून शोध सुरू आहे.
दरम्यान, कुर्ला येथून माहुली येथे मित्रांसोबत फिरायला आलेला सॅमराज राधा हा २१ वर्षीय तरुण धबधब्याखाली डोहात पोहण्यासाठी उतरला होता. परंतू, डोहातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती शहापुर पोलिसांनी सांगितले. माहुली येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सॅमराज ला डोहातून बाहेर काढण्यात आले.