कल्याणमधील शहापूर तालुक्यातील सावरोली गावातील दोन जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी एकाच गुन्ह्यात चार वेगळ्या सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या. या शिक्षा आरोपींनी एकाचवेळी भोगायच्या आहेत. सावरोली गावातील सचीन दौलत भेरे, विकी विष्णू भेरे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

शिवाजी सातपुते यांनी शहापूर पोलीस ठाण्यात मोठ्या भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार केली होती. या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणी पाच वर्ष सुनावणी सुरू होत्या.

हेही वाचा- कल्याण डोंबिवली पालिका शहर अभियंता पदी अर्जुन अहिरे

ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. सचीन कुलकर्णी यांनी सरकार पक्षाची बाजू न्यायालयात मांडली. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एस. खोकराळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालय सादरकर्ता अधिकारी म्हणून साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे, हवालदार व्ही. डी. शिंपी, बी. के. बिन्नर, के. पी. मलिक यांनी काम पाहिले. उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी मार्गदर्शन केले.

सरकारी वकील ॲड. कुलकर्णी यांनी सांगितले, जानेवारी २०१७ मध्ये सावरोली गावातील मुले गावाबाहेरील मैदानावर संध्याकाळच्या वेळेत क्रिकेट खेळत होती. तेथे तक्रारदार शिवाजी सातपुते यांचा मुलगा प्रणित हाही खेळण्यास गेला. विकी भेरे, सचीन भेरे व इतर तीन जण, प्रणित क्रिकेट खेळत असताना प्रणित हा गोलंदाजी करत होता. यावेळी विकी भेरे यांनी प्रणितला तू नो बाॅल टाकतोस असे म्हणाला. प्रणितने त्याला आपण नो बाॅल टाकला नाही असे उत्तर दिले. विकीला त्याचा राग आल्याने त्याने प्रणितच्या कानफटीत मारले. प्रणित रडत घरी आला. त्यावेळी प्रणितचे काका नारायण सातपुते हे विकीच्या घरी जाऊन विकीने मुलाला मारले असे सांगितले.

हेही वाचा- कोपरीतील शिवसेना शाखेवरून वाद; शिंदे गट आणि शिवसैनिक आमने- सामने, अखेर पोलिसांनी काढला मार्ग

नारायण यांनी घरी तक्रार केल्याने रवींद्र भेरे, सचीन भेरे, विकी भेरे हे नारायण यांच्या घरात घुसले. लाकडी दांडके, लोखंडी सळ्या घेऊन त्यांनी नारायण यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण सुरू केली. सातपुते कुटुंबीयांनी मारेकऱ्यांना रोखले परंतु ते ऐकले नाही. नारायणाला आपण ठार मारू, जाळून टाकू अशी भाषा करत ते घटनास्थळावरुन पळून गेले. शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नारायण यांच्यावर शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

हेही वाचा- ठाणे : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस ; विजेच्या कडकडाटासह जोरादार पावसाची हजेरी

घरात घुसणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा चार गुन्ह्यांखाली न्यायालयाने आरोपींना तीन वर्ष, एक वर्ष, दोन वर्ष आणि दोन वर्ष सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या. या चारही शिक्षा आरोपींनी एकाच वेळी भोगायच्या आहेत.