कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील खड्ड्यांमध्ये पाय घसरून पडल्याने दोन ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे हाड मोडले. दोन्ही ज्येष्ठ नागरिकांच्या हातावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दोघेही वेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना चालता येत नाही. वाहन चालकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे तरी, कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन गप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र उपेंद्र पै (५८), गणेश सहस्त्रबुध्दे (७१) अशी खड्ड्यात पडून हाताला गंभीर दुखापती झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत. दोन्ही ज्येष्ठ नागरिक टिळक चौक भागात राहतात. रवींद्र पै सनदी लेखापाल आहेत. ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. पाऊस सुरू होता. टिळक चौकात पाणी तुंबले होते. या पाण्यातून जात असताना रवींद्र यांचा पाय एका खड्ड्यात पडून मुरगळला. ते बेसावधपणे रस्त्यावर पडले. पडताना हात अंगाखाली आल्याने त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. त्यांच्या हातावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये खर्च आला आहे, अशी माहिती सनदी लेखापाल रवींद्र पै यांनी दिली.

रवींद्र यांच्या पत्नीने स्थानिक नगरसेवकाला खड्ड्यांमुळे पतीचा हात मोडला असे सांगितले. स्थानिक नगरसेवकाने ‘बघून नीट चालता येत नाही का’ असे उत्तर दिले असल्याचे रवींद्र पै यांनी सांगितले. खड्ड्यांमुळे मला दुखापत झाली आहे. ठीक होताच मी पोलीस ठाण्यात पालिका आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या विरुध्द तक्रार करून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कल्याण डोंबिवली पालिकेचे खड्ड्यांकडे असलेल्या दुर्लक्षाकडे लेखी तक्रारीतून लक्ष वेधणार आहे, असे पै यांनी सांगितले.

टिळक चौकात राहणारे गणेश सहस्त्रबुध्दे (७१) हे टिळक चौकातून जात असताना त्यांना पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज आला नाही. ते खड्ड्यात पाय घसरून पडले. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. प्लास्टर करून ही दुखापत बरी होणार नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली, असे गणेश सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.

टिळ‌क चौकात सार्वजनिक प्रसाधनगृह, बाजुला कचऱ्याचा ढीग, चौकात खड्डे, बाजुला रिक्षा वाहनतळ अशी कोंडीची परिस्थिती आहे. या भागातून येजा करताना नागरिकांना कसरत करावी लागते. दोन हजार कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेला वेळेत खड्डे बुजविता येत नाहीत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे, अशी खंत सनदी लेखापाल पै यांनी व्यक्त केली. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी चौदा दिवसांच्या रजेनंतर बुधवारी हजर होताच खड्डे भरण्याची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत.

खड्ड्यात पडून मला दुखापत झाली. मी पालिका अधिकाऱ्यांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. ग्राहक मंचाकडे रुग्णालय खर्च भरपाईसाठी दावा दाखल करणार आहे. कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांविषयी पालिकेच्या उदासीनतेची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे.- रवींद्र पै,सनदी लेखापाल, कल्याण

दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यात पडून कोणी जखमी, कोणी दुचाकी वरुन पडून मयत होतात. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन खड्डे भरण्याविषयी निष्क्रिय का राहते. कर भरणा तारीख चुकली तर लगेच पाणी जोडणी खंडित करतात. मग खड्ड्यात पडून जे जखमी होतात त्यांचा रुग्णालय खर्च प्रशासन देणार का. – सुहास चौधरी ,उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two senior citizens broke their bones after slipping in a ditch amy
First published on: 06-07-2022 at 15:52 IST