कुख्यात गुंड रवि पुजारीच्या टोळीतील दोन गुंडांना ठाणे पोलिसांनी शनिवारी अटक केली. एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिनेश राय आणि नितीन राय अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. शनिवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांनाही १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील बातमी दिली आहे.

गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या रवि पुजारीची टोळी आता ५० हजारांसाठीही खंडणीचे फोन करून धमकी देऊ लागल्याची माहिती समोर येते आहे. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून खंडणी मागणारे गुंड आणि बांधकाम व्यावसायिकांचे फोनवरचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. त्याद्वारे ही माहिती समोर आली. रवि पुजारी गँगचे गुंड किंवा इतर गँगचे गुंडही पूर्वी कोट्यवधी रुपये खंडणी म्हणून मागत असत. तसेच ही त्यांची मागणी पूर्णही केली जात असे असे एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. आता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या दिनेश राय आणि नितीन राय या दोघांची कसून चौकशी करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे पोलिसांनी अटक केली. बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा आणि खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप इकबाल कासकरवर आहे. आता  रवि पुजारी गँगच्या दोन शार्प शूटरना अटक करण्यात आली. ठाणे पोलिसांसाठी ही कारवाई म्हणजे मोठे यश मानले जात आहे.