डोंबिवली : गिर्यारोहणाची आवड असलेले डोंबिवलीतील शालेय जीवनातील दोन मित्र हिमाचल प्रदेशमधील किन्नोर भागात झालेल्या हिमस्खलनात मृत्यू पावले आहेत.  अशोक भालेराव (६६), राजेंद्र पाठक (६७) अशी हिमस्खलनात मृत्यू पावलेल्या डोंबिवलीतील रहिवाशांची नावे आहेत. हिमस्खलन झाल्यानंतर त्या धोक्याच्या वातावरणातून बचावासाठी गिर्यारोहकांच्या चमूने दीड तास चालून बचावाचे ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केला. तेथेही प्रचंड हिमवृष्टी होत असल्याने आणि बदलेल्या वातावरणापुढे गिर्यारोहकांचा टिकाव लागला नाही. यामध्ये आघाडीवर असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. उर्वरित १४ जणांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. भूस्खलनात गाडलेल्यांमध्ये डोंबिवलीतील दोघांचा आणि मालाडमधील एकाचा समावेश आहे. मालाड येथील गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून १७ जणांचा चमू हिमाचल प्रदेशात दोन आठवडय़ांपूर्वी गिर्यारोहणासाठी गेला होता. २६ ऑक्टोबरला घरी परतणार होते. गिर्यारोहणच्या शेवटच्या टप्प्यात असताना किन्नोर भागात हिमवर्षांव, हिमस्खलनाला सुरुवात झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पाठक खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. भालेराव ठाकुर्लीत राहतात.