कल्याण, टिटवाळा, कसारा रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर, रेल्वे वाहनतळांवर उभ्या केलेल्या दुचाकी सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून चोरुन नेणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याच्या कडून दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता कल्याण लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- वेब सीरिज पाहून बँकेतून ३४ कोटी लुटण्याचा मॅनेजरचाच प्रयत्न; डोंबिवलीतील घटना

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळावरुन एका दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी गु्न्हा दाखल झाला होता. त्याचा शोध रेल्वे पोलिसांकडून सुरू होता. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हालचालींवरुन पोलिसांनी दुचाकी चोराची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी त्याला टिटवाळा परिसरातून अटक केली. नंदूलाल भोईर असे आरोपीचे नाव आहे. रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, वाहनतळांवर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींवर पाळत ठेऊन सुरक्षा रक्षकाचे थोडे दुर्लक्ष झाले की बनावट चावीच्या साहाय्याने दुचाकी सुरू करुन नंदुलाल दुचाकी घेऊन पळून जायाचा.

हेही वाचा- ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेनं मृत जोडीदाराची १९ कोटींची संपत्ती हडपली, लग्न झालं नव्हतं तरीही…

महात्मा फुले पोलीस ठाणे, टिटवाळा, कसारा रेल्वे स्थानक हद्दीत नंदुलालने अशा दुचाकी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दुचाकी चोरीच्या प्रकरणात भोईर यापूर्वी आधारवाडी कारागृहात होता. त्यानंतर त्याची सुटका झाली होती. सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा दुचाकी चोरण्यास सुरुवात केली होती. नंदूलाल हा आसनगाव रेल्वे स्थानका जवळील शहापूर परिसरातील रहिवासी आहे. नंदुलालने आतापर्यंत किती दुचाकी चोरल्या आहेत. त्या त्याने कोणाला विकल्या आहेत. याचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two wheeler thief arrested in railway station area by kalyan railway police thane news dpj
First published on: 07-10-2022 at 13:59 IST