कल्याण- उल्हास नदीवर स्नान करण्यासाठी गेलेले दोन तरुण उल्हास नदीत बुडून बेपत्ता झाले आहेत. ते उल्हासनगर मधील शांतीनगर भागातील आहेत. अग्निशमन दलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.सलमान अन्सारी, सर्फराज अन्सारी अशी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण शुक्रवारी दुपारी मोहने जवळील उल्हास नदीवर स्नान करणे आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुऊन झाल्यानंतर सलमानला नदीत पोहण्याचा मोह झाला. आपण नदी काठी पोहून बाहेर येऊ असे त्याला वाटले. नदीत उडी घेताच वेगवान पाण्याच्या प्रवाहात तो वाहून जाऊ लागला.
त्याला वाचविण्यासाठी सर्फराजने नदीत उडी घेतली. वेगवान प्रवाह आणि आधारासाठी झाडझुडपे नसल्याने ते वेगाने पाण्याचा प्रवाहात वाहून गेले. ते बचावासाठी ओरडा करू लागले. दूरवर असलेल्या नागरिकांना नदीत दोन जण वाहून जात असल्याचे आढळले. त्यांनी नदी काठी धाव घेतली तोपर्यंत तरुण बेपत्ता झाले होते. तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभाग, पोलिसांना ही माहिती देण्यात आली. तात्काळ अग्निशमन विभागाचे घटनास्थळी येऊन त्यांनी बेपत्ता तरुणांचा शोध सुरू केला. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. शनिवारी सकाळीच बेपत्ता तरुणांचा शोध घेतला जाणार आहे.



