डोंबिवली – डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलावर गेल्या दहा दिवसापूर्वी एक उबेर कार चालकाने दुचाकीवरून गस्तीवर असलेल्या मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. यावेळी जखमी झालेल्या या पोलिसांना रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य न करता संबंधित उबेर कार चालक पळून गेला होता. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतल्यावर यामधील एका पोलिसाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी उबेर कार चालका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
जगदिश जयसिंग काकडे (३४), हवालदार नरूळे अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. ते मानपाडा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. नफिज अहमद शेख (२५) असे उबेर कार चालकाचे नाव आहे. तो मुंबईतील गोवंडीतील बैंगनवाडी भागात राहतो. त्याच्या मोटार वाहन क्रमांकावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली.
हवालदार जगदिश काकडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या दहा दिवसापूर्वी मी आणि हवालदार नरूळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली कोपर मधील शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यालयीन कामासाठी दुचाकीवरून आलो होतो. काम आटोपल्यावर आम्ही पुन्हा दुचाकीने कोपर उड्डाण पुलावरून मानपाडा पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होतो.
कोपर उड्डाण पुलावरून जात असताना बिर्यानी काॅर्नर दुकानाच्या बाजुच्या रस्त्यावर डोंबिवली पश्चिमेकडे कोपर उड्डाण पुलावरून जाणाऱ्या एका उबेर मोटार कार चालकाने आम्हाला जोराची धडक दिली. उबेर कार चालक नफिज शेख निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने कार चालवित होता. त्याच्या कारच्या धडकेने आमची दुचाकी रस्त्याच्याकडेला फेकली गेली. हवालदार नरूळे आणि मी जोराने रस्त्यावर पडलो. नरूळे यांच्या हाताला मुका मार लागला. तर माझ्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ गंभीर दुखापत झाली.
डाॅक्टरांनी हाताच्या मनगटाचे हाड मोडल्याचे तपासणीनंतर सांगितले. अपघात घडल्यानंतर इतर पादचारी नागरिक आमच्या मदतीसाठी पुढे आले. पण अपघात करणारा उबेर कार चालक आता आपणास पादचारी मारहाण करतील या भीतीने आणि आपण पोलिसांच्या दुचाकीला धडक दिली आहे. या विचाराने आम्हाला रुग्णालयात जाण्यासाठी कोणतेही साहाय्य न करता भरधाव वेगात कारने पळून गेला.
उपचार घेतल्यानंतर आम्ही सुस्थितीत झालो. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो आहोत असे तक्रारदाराने म्हटले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
