ठाणे : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांची लाच देऊन हे सरकार तुम्हाला विकत घेऊ पाहत आहेत. पण आपण विकले जायचे की नाही, हे महिलांनी ठरवावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील सभेत बोलताना दिला. राज्य लुटणाऱ्या दरोडेखोरांना सत्ता आल्यावर तुरुंगात पाठविणार असल्याचा इशाराही देत विधानसभेची निवडणूकित आपली लढाई महाराष्ट्र द्वेष्टेबरोबर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शनिवारी पार पडली. पक्षाच्या भगवा सप्ताह निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. कितीही पैसे दिले तरी तुमची भीक आम्हाला नको हे महिलांनी आता ठरवायला हवे कारण पंधराशे रुपयांची लाच देऊन हे तुम्हाला विकत घेऊ पाहत आहे आणि महाराष्ट्राला लुटायला आले आहेत त्यामुळे आपण विकले जायचे की नाही हे ठरवायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात मनसैनिकांचे आंदोलन; ठाकरे यांच्या ताफ्यावर शेणाचा मारा शिंदे सरकार केवळ घोषणा देत आहेत पण, अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. त्यामुळे घोषणा देऊन निवडणूक जिंकता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पैसे देऊन भाज्या विकत घेता येतात पण, मते विकत घेता येत नाही. लोकसभेत विजय दिसत नाही म्हणून त्यांनी लबाडी केली. मुंबईत ४८ मतांनी आपला पराभव होऊ शकत नाही, त्यामुळे कीर्तिकर यांची जागा चोरली, असा आरोपही त्यांनी केला. तीन महिने थांबा, तुमच्या मित्रपरिवाराचा घोटाळा उघडा केल्याशिवाय राहणार नाही तसेच तुमचे आणि सरकारी कलेक्टर यांना तुरुंगात गज बघायला पाठवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याचे मंत्रालय मुंबईत हवे की अहमदाबाद की दिल्लीतून हवे आहे, अशी विचारणा करत मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख दुतोंडी मांडूळ असा केला. संजय राऊत हे नमक हराम २ चित्रपट काढणार असून त्याची आम्हाला उत्सुकता आहे, असेही ते म्हणाले. तू राहशील नाही तर मी राहील, असा पुनरुच्चार करत तू म्हणजे राज्य लुटणारे आणि त्याचे पाय चालणार मांडूळ असेही ते म्हणाले. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घ्यायचे मनसुबे सुरू आहेत. जेणेकरून लाडकी योजनेचे तीन ते चार महिन्याचे पैसे महिलांना मिळतील. परंतु हे फसवा फसवीचे धंदे आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अशीच योजना आणली होती, असे सांगत त्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले. भगवा झेंड्यावर चिन्ह नको, कारण शिवाजी महाराजांचा एकच भगवा झेंडा आहे. अपात्रतेचा निकाल लागेल तेव्हा लागेल, परंतु निवडणूका आल्यामुळे मशाल चिन्ह घरोघरी पोहचवा. लोकशाहीची हत्या करणाऱ्याची बुड जळणारी ही मशाल आहे, असेही ते म्हणाले. हेही वाचा >>> मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर भागात अवजड वाहनांना बंदी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सापाला दूध पाजले तुमच्या पोराबाळांना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पाठवले, असे सांगत आम्ही दिल्ली तुमची कबर खोदायला गेलो होतो, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील सभेत बोलताना केला. ठाणे शिवसेनेचे, चोरांचे नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. काल नागपंचमी झाली, यादिवशी नागाला दुध पाजतात. तसेच उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सापाला दूध पाजले. लोकसभेत शेपट्या वळवळल्या. पण, विधानसभेत आम्ही त्यांचे फने ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. लवकरच नमक हराम 2 सिनेमा काढून ठाण्यातील हरामखोरांवर प्रकाश टाकणारा आहे. निष्ठवंत आनंद दिघे यांच्या नावाने ठाणे ओळखले जायचे पण, गद्दारांनी ठाण्याचे नाव माती मिळवले. गद्दारांनी लबाडी करून निवडणूक जिंकली, अशी टीकाही त्यांनी केली. अनिता बिर्जे यांचा शिंदे सेनेत प्रवेश ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांनी शनिवारी रात्री टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिवसेनेतील फुटी नंतर अनिता बिर्जे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती. त्यांना पक्षप्रवेश देऊन शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.