मागील दोन वर्षापासून शिंदे पिता-पुत्रांबरोबर धुसफूस सुरू असलेल्या शीळ येथील निवासी सुभाष भोईर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. कल्याण लोकसभेच्या कळवा ते अंबरनाथ दरम्यान शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात याच भागातील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भागातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर डोंबिवली ग्रामीण भागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. २०१४ च्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात सुभाष भोईर यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात एकनाथ शिंदे यांच्यासह डोंबिवली ग्रामीण शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे उद्धव समर्थक गट आता मोठ्या ताकदीने भोईर यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. कल्याण, २७ गाव, अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण भागात शिंदे समर्थक शिवसेना नव्याने उभी करताना शिंदे गटाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे, असे स्थानिक ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध
sharad pawar review meeting in pune for baramati lok sabha constituency
सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; बारामती लोकसभेची पुण्यात आढावा बैठक
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली ग्रामीणमध्ये सुभाष भोईर यांना कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्त करून शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी मोठा शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

निष्ठेचा फायदा –

शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुभाष भोईर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘मी आहे तिथेच आहे. मी निष्ठावान शिवसैनिक आहे आणि मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. शिंदे गटाकडून भोईर यांच्यावर अन्याय झाल्याची माहिती मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी भोईर यांना ठाणे भागात पक्षात मोठे पद देण्याचा निर्णय घेतला. भोईर शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचाराने चालणारे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करणारे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे प्रमोद पाटील यांना टक्कर देण्यासाठी २०१४ मध्ये शिवसेनेने भोईर यांना निवडणूक रिंगणात उतरवून निवडून आणले. अनेक विकास कामे या भागात त्यांनी केली. या भागात सक्रिय आमदार म्हणून त्यांनी स्वताची प्रतिमा तयार केली. भोईर यांचा कल्याण ग्रामीण भागात वाढणारा वाढता दबदबा हळूहळू शिंदे गटाला खुपू लागला. भोईर यांनी आमदार म्हणून मंत्रालय, जिल्हा विकास नियोजन विभागातून निधी आणून कल्याण तालुक्यातील २७ गाव, शीळ भागात विकास कामे केली की शीळफाटा रस्त्यावर, विकास कामे सुरू असलेल्या भागात शिवसेनेतील बड्या नेत्यांचे छबी असलेले मोठे फलक भोईर यांच्या विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी झळकायचे. यावरुन संबंधित नेते आणि भोईर यांच्या धुसफूस व्हायची. विकास निधी आणला कोणी आणि त्याचे श्रेय घेते कोण, अशीही चर्चा या भागात सुरू व्हायची.

भोईर यांची कल्याणमध्ये शिंदे गटाकडून झालेली कुचंबणा –

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवारी यादीत कल्याण ग्रामीण मध्ये भोईर यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आयत्यावेळी ठाण्यातील एका नेत्याच्या हट्टाखातर डोंबिवलीतील रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. भोईर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. तेव्हापासून भोईर गट शिंदे गटावर नाराज होता. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सुभाष भोईर यांनी मातोश्रीवर उद्धव यांच्या भेटी घेतल्या. भोईर यांची कल्याणमध्ये शिंदे गटाकडून झालेली कुचंबणा ओळखून उध्दव ठाकरे यांनी भोईर यांना कल्याण लोकसभेचे संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याचे सुत्राने सांगितले.

राजकीय कारकिर्द –

ठाणे महापालिकेत १९८६ ते २००७ पर्यंत पाच वेळा नगरसेवक. शिक्षण मंडळ सभापती, सिडकोचे संचालक, परभणी, हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार होते. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. सर्व शिवसैनिकांना बरोबर घेऊन पक्ष वाढविण्यासाठी काम करणार आहे. उध्दव ठाकरे यांना जी नव्या दमाची शिवसेना हवी आहे ती उभी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,असं भोईर म्हणाले आहेत.