डोंबिवली : शिवसेना-भाजपची युती अभेद ठेवण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली. महाजन यांच्यामुळे भाजपला ओळख मिळाली. त्याच महाजन यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी नाकारली. म्हणजे निष्ठावानांना डावलायचे आणि कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला उमेदवारी द्यायची. भाजपची ही वाटचाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का, असा सवाल उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी डोंबिवलीत मुसळधार पावसात झालेल्या प्रचार सभेत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेसाठी उध्दव ठाकरे डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे आले होते. सभा सुरू होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात भिजत उध्दव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. मुसळधार पाऊस ही आपल्या विजयाची नांदी आहे. या असल्या पावसात आपली मशाल कधीच विझणार नाही. याऊलट ती अधिक प्रज्वलीत होऊन भाजपसह कल्याण लोकसभेतील गद्दारांना आता गाडून टाकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीला उदयपूरमधून अटक

आपल्यावर घराणेशाहीच्या आरोप करणाऱ्या भाजपने आता उपरे, गद्दारांची पोर का कडेवर घेतली आहेत. भाजपची ओळख प्रमोद महाजन यांच्यामुळे आहे. आता महाजन यांच्या मुलीला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. म्हणजे भाजपचे दोन खासदार होते, त्यावेळी भाजपच्या वाढीसाठी खस्ता खाल्लेल्या महाजन यांच्या निष्ठावान मुलीला घरचा रस्ता आणि गद्दारांच्या पोरांना हे कडेवर घेऊन निवडून आणण्यासाठी चालले आहेत. मग ही भाजपची वाटचाल संघाला मान्य आहे का, असा प्रश्न उध्दव यांनी केला.

भाजप आमदार गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. त्यांनी शिंदे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले आहेत, त्यांची ईडी चौकशी का लावली जात नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले तेथे या हुकुमशहांना जाण्यास वेळ नाही, मात्र कल्याणमध्ये एक लढवय्यी महिला हुकुमशहांच्या विरोधात निवडणूक लढवित आहे तर तिच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हुकुमशहांना वेळ आहे, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा…मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या डोंबिवलीतील अपक्ष उमेदवाराला भाजप कार्यकर्त्याची धमकी

हे मोदींचे नव्हे तर गझनीचे सरकार ४ जून नंतर देशात नसेल. त्यामुळे भाजपमधील उरलेल्या धोंड्यांचे काय उरणार हा प्रश्न आत्ता भाजपला सतावू लागला आहे. व्यवहारातील नोटा एका क्षणात मोदींनी बाद केल्या. त्याप्रमाणे ४ जूननंतर मोदीमुक्त भारत जनतेने केला असेल, असे भाकित ठाकरे यांनी वर्तविले.

हेही वाचा…मोदींच्या सभेमुळे प्लास्टिक कचरा वेचकांचा चांदी

कल्याण लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवार नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये ते झुंजी लावत आहेत. दुसऱ्यांची पोरे कडेवर घेऊन त्यांचा प्रचार करत आहेत. असा हा कमळाबाईचा कारभार काही कामाचा, रामाचा नसल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticizes bjp and eknath shinde s shiv sena in kalyan mumbai print news psg