उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी ठाण्यात, दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरे गट पक्षीय ताकद दाखविणार | uddhav thackeray followers gathering at Thane to show their strength | Loksatta

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी ठाण्यात, पक्षीय ताकद दाखविणार

ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने आज सकाळी १० वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

Thane, Uddhav Thackeray, Eknath Shinde, followers
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी ठाण्यात, दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरे गट पक्षीय ताकद दाखविणार ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

ठाणे : शिवसेनेत खिंडार पडल्यानंतर आज ठाण्यात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने ठाण्यात जोरदार तयारी केली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरासह नवी मुंबई, मिरा भाईंदर येथील ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ठाण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील मुख्य मार्गांवर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी फलक उभारण्यात आले आहेत. तसेच समाजमाध्यमांवरही ठाकरे गटाचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे संदेश प्रसारित करत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे गटाला पक्षाची ठाण्यातील आपली ताकद दाखविण्याची संधी मिळणार आहे.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आजवर शिवसेनेची सत्ता राहीली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा दबदबा आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठा फूट पडली. सध्या ठाण्यात एकनाथ शिंदे यांना नगरसेवकांनी मोठा पाठिंबा दिला आहे. तर काही जुने शिवसैनिक अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांचा ठाणे दौरा निश्चित झाला आहे. ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने आज सकाळी १० वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ठाकरे गटाच्या ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर येथील पदाधिकाऱ्यांना ठाण्यात जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निमित्ताने ठाकरे गट त्यांची ताकद दाखविण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात; एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रत्येकाला…”

हेही वाचा… मीरा रोड येथील ‘ब्रँड फॅक्टरी’ला भीषण आग; तीन कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश

दौरा कसा असेल

आरोग्य शिबीराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी उद्धव ठाकरे हे दिवंगत आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तेथून पुढे ते चरई येथील संकेश्वर पार्श्वनाथ जिनालय अंजनशलाका या महोत्सवास भेट देतील. त्यानंतर येथील जैन मंदिरात भेट देणार आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:15 IST
Next Story
मीरा रोड येथील ‘ब्रँड फॅक्टरी’ला भीषण आग; तीन कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश