ठाणे : शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात संयुक्त मोर्चाची हाक पुकारली असतानाच, रविवारी ठाणे शहरात शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली. मराठी माणसाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. तर, दिव्यात देखील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांसह हिंदी भाषा देखील सक्तीची करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतू, इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती नको असा विरोध सर्वसामान्य जनतेसह विविध राजकीय पक्षांकडून होताना दिसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात तसेच शहरांमध्ये हिंदी सक्ती विरोधात निदर्शने होऊ लागले आहेत. ठाणे आणि दिवा शहरातही रविवारी ठाकरे गटाकडून हिंदी सक्ती विरोधात निदर्शने करण्यात आली.
ठाण्यातील जांभळी नाका चौकात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्ती विरोधात “शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी”करण्यात आली यामध्ये शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे,मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई त्याचबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी रेखा खोपकर,ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष साबीया मेमन, आदी सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, रद्द करा रद्द करा, हिंदीची सक्ती कायदा रद्द करा अशा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर, दिवा शहरात देखील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा निर्धारपूर्ण घोषणा देत सरकारच्या हिंदी सक्ती निर्णयाचा निषेध केला.