ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून हल्ला केला. तसेच गडकरी रंगायतन परिसरात त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर ठाण्यात ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आले होते. यावेळी नितीन कंपनी भागात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याच्या दिशेने नारळ फेकले होते. या हल्ल्यात ताफ्यातील एका वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच गडकरी रंगायतन परिसरात उद्धव ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला.

हेही वाचा…दिघेंची ‘ही’ वाघीण ठाकरे गटातून शिंदे गटात, धर्मवीर चित्रपटात गाजले होते पात्र

या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच मनसेच्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात. गडकरी रंगायतनमध्ये दोन ते तीन हजार शिवसैनिक होते. हे शिवसैनिक खाली उतरले असते तर वेगळ काही घडल असतं, शिवसैनिकांवर हल्ले करण्याची भाषा करू नका, असे राजन विचारे म्हणाले. लहान मुले सुद्धा दगडफेक करून पळून जातात. तसाच हा प्रकार आहे. ही मर्दाची लक्षणे नाहीत. नारळ फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिथून जीवघेत पळत सुटले अशी टीका विचारे यांनी केली.

हेही वाचा…अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर गुन्हा

ही घटना अत्यंत निंदनीय आहे. स्टंट करण्यासाठी, पक्षासाठी काही तरी करतोय हे दाखविण्यासाठी असले प्रकार करण्यात आले आहेत. नारळ फेक करताना सर्वसामान्य नागरिक ये-जा करत होते. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना हे नारळ लागून गंभीर दुखापत झाली असती. त्याला कोण जबाबदार असते असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला.