ठाणे : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज, गुरुवारी दुपारी ठाण्यात येणार आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर तसेच पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे गुरुवारी दुपारी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
हत्येनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. या प्रकरणातील तपास आणि आरोपींवरील कारवाईबाबत ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पोलिसांकडे मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी ठाण्यात येणार आहेत. दुपारी १ वाजता ते मानपाडा येथील नित्यानंद धाम, गणेश नगर येथे पूर्णेकर यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
या भेटीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर आधीच ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
पूर्णेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके कार्यरत आहेत. तपासात राजकीय, वैयक्तिक, आर्थिक अशा विविध शक्यतांचा विचार केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या प्रकरणावर पक्षाची पुढील भूमिका काय असेल आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाबाबत ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
