मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा, शिवसेनेतील बंडाळीनंतर प्रथमच ठाण्यात

सध्या मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उद्धव यांचा पहिलाच दौरा होणार असून या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray visit thane
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा (लोकसत्ता ग्राफिक्स)

ठाणे : सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मोठे समर्थन मिळाले असून पक्षातील या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच ठाणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे सध्या मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उद्धव यांचा पहिलाच दौरा होणार असून या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आजवर शिवसेनेची सत्ता राहीली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याची कमान हाती घेतली. त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्याबरोबरच त्यांनी स्वतचा दबदबा निर्माण केला. यामुळेच बंडखोरीनंतर त्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले.

हेही वाचा – ठाणे : तडीपार आरोपी अटकेत, भिवंडी पोलिसांची कारवाई

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखापासून ते पालिकांमधील नगरसेवकांनी उघडपणे त्यांचे समर्थन केले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख केंद्र असलेले टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम हे सुद्धा शिंदे यांच्याच ताब्यात असल्याचे दिसून येते. पक्षात मोठी बंडाळी होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला तरी उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहराचा दौरा केला नव्हता. त्यामुळे त्यांचा दौरा कधी होणार आणि ते शिवसैनिकांना काय संबोधित करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच गुरुवारी त्यांचा ठाणे दौरा निश्चित झाला आहे.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी पाणी नाही, जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक कामांमुळे पाणीपुरवठा बंद

दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:38 IST
Next Story
ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी पाणी नाही, जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक कामांमुळे पाणीपुरवठा बंद
Exit mobile version