ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे अत्यंत जवळचे सहकारी उद्धवराव जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. उद्धवराव हे आनंद दिघे हयात असताना त्यांच्यासोबत काम करत. आनंद दिघे यांनी त्यांच्यासाठी ठाण्यात वेगळे पद निर्माण केले होते. त्यांना ‘शहर शाखाप्रमुख’ असे पद दिले होते. अनेक शिवसैनिकांना उद्धवराव यांचे मार्गदर्शन लाभले होते. धर्मवीर चित्रपटात देखील त्यांची भूमिका दाखविली होती.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे ठाण्यातील त्यांच्या टेंभीनाक्यावरील आनंद मठातून त्यांच्या पक्षाचे कामकाज करत. त्यावेळी त्यांच्यासोबत काम करताना अनेक शिवसैनिकांना त्यांनी घडविले होते. ठाणेकरांची कोणतीही समस्या असो. आनंद दिघे हे त्यांच्या मठातून ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असे. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेकांनी काम केले होते. त्यामध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, दिवंगत आमदार मो.दा.जोशी. माजी खासदार राजन विचारे यांच्यासह अनेकजणांचा सामावेश होता. आनंद दिघे यांच्यासोबत काम करणाऱ्यांमध्ये उद्धवराव जगताप हे देखील होते. गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच, ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली.

शिवसेना फूटीनंतर शिंदे यांच्यासोबत उद्धवराव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले. वृद्ध असतानाही त्यांच्यामधील शिवसैनिक जागा होता. त्यामुळे अखेरपर्यंत ते शिवसेनेसाठी काम करत राहिले. अनेक आंदोलन किंवा शिवसेनेच्या मेळाव्यांना ते उपस्थित राहत होते. मुंब्रा येथे शिवसेना शाखेवरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला होता. या शाखेसाठी स्वत: उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी शिंदे गटासोबत उद्धवराव जगताप हे शाखेसमोर आंदोलनासाठी बसले होते. ठाण्यातील अनेकांना ते मदत करण्याचा प्रयत्न करत असे.