सागर नरेकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर : राज्याच्या जलसंपदा विभागाने ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीची पूररेषा २०२० या वर्षांत मंजूर केली. मात्र कर्जतपासून आखलेली ही पूररेषा उल्हासनगरात स्पष्ट नाही. तसेच शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीची पूररेषा निश्चित नसल्याने या भागात अतिक्रमणे वाढत आहेत. परिणामी पालिकेला अशा भागात कारवाई करताना अडचण येत असून पावसाळय़ात या मालमत्ता पुराच्या पाण्यात जात असल्याने त्याच्या संरक्षणाचा प्रश्नही पालिकेपुढे आहे. त्यामुळे वालधुनी तसेच उल्हास नदीची पूररेषा निश्चित करावी अशी मागणी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाला करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीला येणाऱ्या पुरामुळे गेल्या काही वर्षांत बदलापूर, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत होते. बदलापुरात पूररेषा निश्चित नसल्याने नदीपात्रापर्यंत बांधकामे वाढली. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसला. तर त्याच वेळी ग्रामीण भागातही नदीपात्राजवळ अतिक्रमणे होत होती. जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार २०२० या वर्षांत उल्हास नदीची पूररेषा निश्चित करण्यात आली. कर्जत तालुक्यापासून थेट कल्याण तालुक्यापर्यंत ही पूररेषा आखली गेली. मात्र उल्हासनगर शहरात ही पूररेषा स्पष्ट नसल्याचे उल्हासनगर महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीची कोणतीही रेषा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे.

दरवर्षी वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागताच आसपासच्या लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरते. त्या वेळी त्याचे खापर पालिका प्रशासनावर फोडले जाते. पूररेषा निश्चिती नसल्याने नदीपात्राजवळ अनेक घरांची उभारणी करण्यात आली आहे. ज्या भागात दरवर्षी पाणी शिरते अशा भागातही अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे दरवर्षी येथील मालमत्तांचे नुकसान होत असते. त्यामुळे पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषा निश्चिती करण्याची मागणी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने ठाणे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पूररेषेची निश्चिती नसल्याने येथे अनधिकृत बांधकामे वाढत असल्याची बाब पालिका प्रशासनाने नमूद केली आहे. त्यामुळे वालधुनीला पर्यावरणादृष्टय़ा धोकाही निर्माण झाला आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधला असता, पूररेषा प्रकरण न्यायालयात असल्याने त्याबाबत प्रतिक्रिया देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

पालिकेची दुहेरी कोंडी

वालधुनी नदीच्या किनारी उभ्या असलेल्या घरांमध्ये दरवर्षी पाणी साचते. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे पाणी साचण्याचे प्रकार सुरू आहेत. ही घरे पूररेषेत आहेत. मात्र रेषेबाबत निश्चिती नसल्याने येथील नागरिक पाण्यापासून बचावासाठी पालिकेवर दबाव आणतात. ही नैसर्गिक बाब असल्याने पालिकेची दोन्ही बाजूने कोंडी होते आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhas river flooding not clear in ulhasnagar zws
First published on: 27-05-2022 at 00:08 IST