शहरबात बदलापूर : नव नागरी-श्रीमंतांची ‘दासी’ उल्हासनदी

ल्हास नदीच्या पुरुज्जीवनासाठी केंद्र शासनाच्या योजनेनुसार एका आराखडा तयार करण्यात आला होता.

(संग्रहित छायाचित्र)

संथ वाहत तीरावरल्या सर्वाची सुखदु:खांशी समरस होणाऱ्या नदीचं महत्त्व भारतीय समाजजीवनात अनन्यसाधारण होतं. तिच्या काठावर सुखाने नांदणाऱ्या समाजाने जेव्हा आरामदायी जीवनात प्रवेश केला, तो क्षण औद्योगिक क्रांतीचा होता. उद्योगांची चाकं रात्रंदिवस फिरू लागली आणि धरणीमातेला बारमाही ओलावा पुरवणारी ही माय सांडपाण्यानं बरबटून गेली. आता तर तिच्या पोटात प्रक्रिया न केलेली रसायनंही सोडली जात आहेत. विकासाच्या मागे धावणाऱ्या नवश्रीमंतांनी तिला दासी बनवलं आहे.

चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणारी अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे औद्योगिक उपद्व्यापांमुळे सध्या चर्चेत आहेत. त्यात सर्वाधिकभरडले जातात ते नैसर्गिक जलप्रवाह. मानवी विकास, औद्योगिक वसाहती आणि शासकीय अनास्था मग ती स्थानिक स्वराज्य संस्थांची असो वा प्रदूषण नियंत्रण मंडळांची, ही अनास्था नदी-नाल्यांच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे ज्या नदीच्या पाण्यावर लोकवस्त्यांचे भविष्य अवलंबून आहे त्याच नदीच्या पुनरुज्जीवनाकडे कुणाचेही लक्ष नाही. सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, नेते मंडळी, राजकीय पक्ष यांपैकी कुणालाही या नदी प्रदूषणाशी काही देणेघेणे दिसत नाही. ठाणे जिल्ह्य़ाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उल्हास नदीची सध्या अशीच दारुण अवस्था आहे. सध्या ही नदी नव नागरी-श्रीमंतांची दासी बनल्याचे चित्र आहे.

सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणारी उल्हासनदी शंभरहून अधिक किलोमीटरचे अंतर कापत अरबी समुद्राला जाऊन मिळते. उगमापासून काही किलोमीटपर्यंतचा या नदीचा प्रवास शुद्ध आहे. मात्र नदी ज्या वेळी शहरात प्रवेश करते तेव्हापासून या नदीच्या वाताहतीला सुरुवात होते. गेल्या काही वर्षांत उल्हास नदीकिनारी असलेली कर्जत, भिवपुरी, नेरळ, वांगणी अशी शहरे मोठी झाली आहेत. याशिवाय त्याही आधीपासून अनेक नवश्रीमंत मुंबईकरांनी नदीकिनारी सेकंड होम्स घेतली आहेत. मात्र त्यामुळे नदी आपले मूळ स्वरूप हरवून बसली आहे. बेशिस्त नागरीकरण आणि औद्योगिकीकरण नदीच्या मुळावर आले आहे. कल्याण ते कर्जत परिसरातील बहुतेक शहरांमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन करणारी सक्षम आणि पुरेशी यंत्रणा नाही. अस्तित्वात असलेले प्रकल्प अपुरे आणि सदोष आहेत. त्यामुळे जसेच्या तसे सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे उल्हास नदीचे पात्र दूषित होत आहे. उल्हास नदीच्या प्रदूषणास बदलापूर शहर सर्वाधिक कारणीभूत आहे. उल्हास नदी बदलापूर शहरात प्रवेश करते तेव्हाच रासायनिक सांडपाण्याने तिचे स्वागत केले जाते. खरवईजवळ एक नाला नदीपात्रात मिसळतो. त्या नाल्यातून अनेकदा रासायनिक सांडपाणी नदीत मिसळले जाते. मात्र औद्योगिक वसाहती असे कोणतेही प्रदूषण करत नसल्याचा दावा औद्योगिक विकास महामंडळाकडून केला जातो. पुढे बदलापूर गावाकडे जाणाऱ्या पुलाखालून जाताना उल्हास नदीत प्रदूषणाची भरच पडते. या पुलाजवळील नदीच्या प्रवाहात शेकडो वाहने दररोज धुतली जातात. त्यात रिक्षा, दुचाकी, ट्रक, टेम्पो अशा वाहनांचा समावेश आहे. येथूनच हजारो रुपयांचे पाणीही शहरात बांधकाम व्यावसायिकांना विकले जाते. या पाणीचोरीविषयी पाटबंधारे विकास महामंडळही मूग गिळून गप्प असते. नदी सुशोभीकरणासाठी आणि नागरिकांना विरंगुळा मिळावा यासाठी काही वर्षांपूर्वी पुलाच्या दुसऱ्या बाजूला चौपाटी तयार करण्यात आली होती. त्यामुळे विविध देवी-देवतांच्या मूर्ती विसर्जनासाठी येथे चांगली जागा तयार झाली. तसेच वर्षभरातील विविध सणांमध्ये वापरले जाणारे धार्मिक निर्माल्यही दररोज येथे मोठय़ा प्रमाणावर टाकले जाते. पुढे काही अंतरावर शहरातील सांडपाणी वाहून नेणारा नाला नदीला मिळतो. तसेच वालिवली पुलाजवळही अशाच प्रकारे एक मोठा नाला नदीला मिळतो. त्यात अनेकदा रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रासायनिक सांडपाणी, कचरा, निर्माल्य अशा गोष्टी आपल्या पोटात घेत नदी कल्याण तालुक्याच्या दिशेने प्रवास करते. मात्र तोपर्यंत नदीची पुरती वाताहत झालेली असते. पुढे हेच पाणी कल्याण तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, महापालिका आणि शहरांना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिकविकास महामंडळ उचलून त्यावर प्रक्रिया करीत असते. मात्र तीन ते चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला नदी प्रदूषणाबाबत कळविण्यात आले होते. नदीतील ज्या भागातून शुद्धीकरणासाठी पाणी उचलले जाते त्या ठिकाणी पाण्याचा दर्जा खालावला असून त्यात रासायनिक घटक असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. यावरून उल्हास नदीतील पाण्याच्या दर्जाबाबत कल्पना येऊ शकते. त्यामुळे हे नदी प्रदूषण रोखण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्याची गरज आहे.

काही वर्षांपूर्वी उल्हास नदीच्या पुरुज्जीवनासाठी केंद्र शासनाच्या योजनेनुसार एका आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र त्यावर ठोस काही होऊ  शकले नाही. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक नगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावले होते. प्रदूषणाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे का दाखल करू नये अशी विचारणाही या वेळी हरित लवादाने केली होती. मात्र अमृत योजनेची घोषणा करत नदी प्रदूषणाला रोखण्याचा आणाभाका घेतलेल्या राज्य शासन आणि स्थानिक पालिका प्रशासनाचे सध्या प्रदूषणाकडे दुर्लक्षच होते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ulhas river in the thane badlapur belt are reeling under pollution

ताज्या बातम्या