UPI Charges Protest Ulhasnagar Ambernath: सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात केंद्र सरकारकडून यूपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चेने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या संभाव्य आर्थिक भाराला विरोध दर्शवण्यासाठी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी गुरुवारी आपल्या दुकानांवरील यूपीआय पेमेंटचे बोर्ड आणि क्यूआर कोड थेट हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता बाजारात येणाऱ्या ग्राहकांना खरेदीसाठी खिशात रोख रक्कम बाळगणे अनिवार्य ठरू लागले आहे.

गेल्या काही वर्षांत अगदी साध्या किराणा दुकानांपासून ते मोठ्या शोरूम्सपर्यंत सर्वच ठिकाणी ग्राहकांकडून यूपीआयचा मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत सहजतेने वापर केला जात आहे. खिशात पाकीट नसले तरी केवळ मोबाईलच्या आधारे खरेदी करण्याची सवय आता सर्वसामान्यांना लागली आहे. मात्र, यूपीआय व्यवहारांवर दुकानदारांना अतिरिक्त शुल्काचा भार सहन करावा लागणार असल्याच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याच नाराजीतून काही दुकानदारांनी अचानक यूपीआय पेमेंटची सुविधा बंद केल्याने, केवळ मोबाईलवर अवलंबून असणाऱ्या आणि पुरेशी रोकड न बाळगणाऱ्या ग्राहकांची बाजारात मोठी गैरसोय होत आहे.

आम्ही आधीच वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर शासनाला वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून कर अदा करत आहेत. त्यातच आता ग्राहकांना रोख व्यवहारांऐवजी डिजिटल पेमेंटची सवय लागलेली असताना, यूपीआयसारख्या सुलभ आणि जलद प्रणालीवर अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्याचा थेट आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसेल असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. तसेच, या शुल्काचा अप्रत्यक्ष बोजा भविष्यात ग्राहकांच्याच माथी पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परिणामी, व्यापारावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे.

या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शॉपकीपर असोसिएशनने या प्रकरणात भूमिका मांडली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे यूपीआय व्यवहारांवरील शुल्काचा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्याही आर्थिक हिताचा विचार करून सरकारने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा आणि सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होण्यासाठी व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी उल्हासनगर शॉपकिपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी केली आहे.

उल्हासनगर शहर हे ठाणे जिल्ह्यातील एक मोठे व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. घाऊक, किरकोळ खरेदी – विक्रीसह येथे अनेक लहान मोठ्या उद्योगांमधून उत्पादन सुरू असते. कापड, लाकूड अर्थात फर्निचर, जुनी वाहने, विद्युत उपकरणे, मोबाईल अशी हजारो दुकाने, कारखाने शहरात आहेत. येथे दररोज कोट्यावधींची उलाढाल होत असते.

‘चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड’ या व्यापारी संघटनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून व्यापाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. १५ ऑक्टोबर २०२६ पासून २००० रुपयांवरील युपीआय व्यापारी व्यवहारांवर प्रस्तावित ०.४ टक्के एमडीआर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला संघटनेने विरोध दर्शवला आहे. संघटनेच्या मते, आजच्या काळात २००० रुपये ही मोठी रक्कम नसून, या अतिरिक्त शुल्कामुळे अल्प नफ्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर आर्थिक बोजा पडेल. या निर्णयामुळे व्यापारी पुन्हा रोख व्यवहारांकडे वळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने झिरो-एमडीआर धोरण सुरू ठेवावे आणि यूपीआयचा भुर्दंड व्यापाऱ्यांच्या माथी मारू नये, अशी आग्रही मागणी ‘कॅमिट’ने केली आहे.

केंद्र सरकारचा निर्णय हा डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठीच महत्त्वाचा आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांसह जवळपास ९६ टक्के व्यापारी, दुकानदार मुक्त आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. याबाबत जनजागृती करू. – कुमार आयलानी, आमदार, भाजप उल्हासनगर.

आधी सरकारने ग्राहकांना डिजिटल पेमेंट करण्यास प्रोत्साहन दिले. आता त्याचा भार व्यापाऱ्यांवर टाकल्यास त्यांच्या किरकोळ नफ्यात तूट होईल. आधीच कार्ड पेमेंटवर दोन टक्के भार पडतो. त्यामुळे ग्राहक पुन्हा रोखीच्या व्यवहाराकडे वळतील. – निशांत शिरसाठ, फर्निचर व्यापारी, उल्हासनगर.