उल्हासनगरः उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली. या तोडफोडीच्या घटनेमुळे भयभीत झालेल्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी गुरूवारी सकाळी तातडीने काम बंद आंदोलन पुकारले. यावेळी सुरक्षेचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे काम करणे किती कठीण झाले आहे, याबद्दल कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तोडफोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालयात शस्त्रधारी पोलीस तैनात करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
भगवान निंभोरे यांना रात्री उशिरा उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निंभोरे यांच्या मृत्यूची बातमी कळताच, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातवाईकांनी केला. नातेवाईकांनी यावेळी रुग्णालयात गोंधळही घातला. यातील दोन ते तीन जणांनी मृत रूग्णाच्या शेजारीच असलेले डॉक्टर, कर्मचारी दालन, साहित्य आणि उपकरणांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.
या घटनेनंतर रूग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेजारी असलेल्या इतर रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागला. याची माहिती रूग्णालय प्रशासनाने मध्यवर्ती पोलिसांना दिली. त्यांनतर तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने डॉक्टरांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तोडफोडीच्या घटनेनंतर तत्काळ प्रतिक्रिया देत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले. यावेळी डॉक्टरांनी गंभीर आरोप केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कोणत्याही प्रकारची पुरेशी सुरक्षा पुरवली जात नाही. याशिवाय, इथल्या स्थानिक राजकारणामुळे आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. राजकीय दबावामुळे अनेकदा चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्यावे लागते. उपचारात काही विपरीत घडल्यास रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आरोप करत अशाप्रकारे तोडफोड केली जाते, ज्यामुळे वैद्यकीय सेवा देणे धोकादायक ठरत आहे, अशीही प्रतिक्रिया यावेळी डॉक्टरांनी दिली.
या आंदोलनानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली. तोडफोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक केली जाईल. तसेच, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस नेमला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले असून, रुग्णालयातील सेवा पूर्ववत सुरू झाल्या आहेत.
