उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेना व सहकारी पक्ष भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. तीन महासभांसाठी निलंबित करण्यात आलेले भाजपचे नगरसेवक प्रधान पाटील यांनी या विशेष सभेला हजेरी लावल्याने, महापौर अश्विनी निकम यांनी संतप्त होत सुरक्षा रक्षकांना पाचारण केले व पाटील यांना थेट सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.

महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत महापौर अश्विनी निकम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत, भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्यावर तीन महासभांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई अद्याप लागू असतानाच, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या महत्त्वाच्या विशेष महासभेत पाटील यांनी अचानक हजेरी लावली व ते सभागृहात आपल्या जागेवर जाऊन बसले.

पाटील सभागृहात उपस्थित असल्याचे महापौरांच्या निदर्शनास येताच त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. निलंबनाचा कालावधी संपलेला नसताना त्यांनी सभागृहात प्रवेश कसा केला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने सुरक्षा रक्षकांना बोलावले व पाटील यांना सभागृहाबाहेर काढण्याचे देण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या या अनपेक्षित कारवाईमुळे सभागृहात काही काळ प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.

‘न्यायालयात दाद मागणार’

महापौरांच्या आदेशानंतर सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करण्यापूर्वीच प्रधान पाटील यांनी स्वतःहून सभागृहातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाहेर पडताना त्यांनी महापौरांच्या या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला. शहराच्या भल्यासाठी व पालिकेच्या कामकाजात कोणताही अडथळा नको म्हणून मी सध्या सभागृहाबाहेर जात आहे. मात्र, माझा हा अपमान नसून लोकशाहीचा अपमान आहे. महापौरांच्या या एकतर्फी निर्णयाला मी थेट न्यायालयात आव्हान देणार असून, कायदेशीर लढा देऊन मी पुन्हा या सभागृहात मानाने परत येईन, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या निमित्ताने बोलावलेल्या या विशेष सभेत घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे, उल्हासनगर महापालिकेतील शिवसेना आणि भाजपमधील टोकाचा विरोध आणि राजकीय तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.