उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणारी विशेष महासभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वाद व नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चरंगली असली तरी, प्रत्यक्षात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर रखडलेल्या या नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसाठी ७ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरणे व ११ सप्टेंबरला विशेष महासभा घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मनपा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी महापौरांच्या निर्देशानुसार ही निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले. आयुक्तांच्या पत्रात कारण स्पष्ट नसले तरी, महापौर अश्विनी निकम यांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात या स्थगितीचे मूळ कारण स्पष्ट केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या वकीलांनी स्वीकृत सदस्यांच्या निवडीचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायालयाच्या सर्व कायदेशीर बाबी समजावून घेणे व या प्रक्रियेबाबत राज्य शासनाकडून योग्य ते निर्देश घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत महापौरांनी या पत्रात व्यक्त केले आहे. शासन व कायदेतज्ज्ञांचा पुढील अभिप्राय प्राप्त होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया राबवणे योग्य ठरणार नाही, त्यामुळेच ही निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
एकीकडे हे कायदेशीर कारण समोर आले असले तरी, राजकीय वर्तुळात शिवसेना व भाजपमधील अंतर्गत धुसफूस व एका वरिष्ठ नेत्याच्या अनुपस्थितीमुळे नावांवर एकमत न झाल्याची चर्चा सुरूच आहे. ७८ पैकी ७७ नगरसेवक सत्ताधारी युतीचे असल्याने या सातही जागा त्यांच्याकडेच येणार आहेत. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे उमेदवारांमध्ये मोठी चुरस आहे. आता राज्य शासनाकडून कायदेशीर अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर व गणेशोत्सव संपन्न झाल्यानंतरच या प्रक्रियेला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र तिकीट त्यागून किंवा मागच्या दाराने सभागृहात जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांच्या पदरी निराशाच पडली आहे.
शिवसेनेला चौथ्या जागेची आशा
उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर असला तरी उपमहापौर असलेल्या भाजपचे संख्याबळ सध्या एकने अधिक आहे. त्यात शिवसेनेच्या दोन सदस्यांना अपात्र ठरवल्याने भाजपच्या वाट्याला एक अधिकची जागा येते आहे. शिवसेनेच्या वतीने अपात्रतेला आव्हान देण्यात आले असून त्यावर येत्या काळात निर्णयाची शक्यता आहे. त्यामुळे निकालापर्यंत निवडणूक स्थगित करण्याची शिवसेनेची मागणी आहे.
“दोन सदस्यांचे अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयीन अभिप्राय व सरकारचे निर्देश याच्यासाठी ही निवड काही काळासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला आहे.” – अरुण आशान, सभागृह नेता, शिवसेना.
