उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेत गुरूवारी पार पडलेल्या बहुचर्चित स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत शिवसेनेने राजकीय खेळी करत कोटा नसतानाही आपल्या आघाडीतील पाच सदस्य निवडून आणत भाजपला धक्का दिला आहे. त्याचवेळी चार सदस्यांचा कोटा असलेल्या भाजपच्या वाट्याला केवळ दोनच जागा आल्या आहेत.
छाननी प्रक्रियेदरम्यान रंगलेले राजकीय नाट्य आणि सत्ताधाऱ्यांमधील वादंगानंतर अखेर या सातही उमेदवारांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याची घोषणा महापौर अश्विनी निकम यांनी केली. यात शिवसेनेकडून पंचम कालानी, रमेश चौहान, हेमा पिंजानी, निलेश बोबडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर आशा पवार यांची वर्णी लागली आहे, तर भाजपकडून केवळ राजेंद्र श्रीखंडे आणि धनंजय बोडारे यांना सभागृहात प्रवेश मिळाला आहे. यानंतर भाजपने या निर्णयाविरूद्ध न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा जाहीर केले आहे.
या निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून सुरूवातीला अतिआत्मविश्वासात धनंजय बोडारे, राजेंद्र श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी अशा चार जणांचेच अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, अर्जांच्या छाननी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटींमुळे भाजपचे उमेदवार कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. विशेष म्हणजे, भाजपकडे यावेळी कोणताही अतिरिक्त किंवा पर्यायी उमेदवार उपलब्ध नसल्याने पेच निर्माण झाला. हातातून जाणाऱ्या जागा वाचवण्यासाठी भाजपने महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे ऐनवेळी अपक्ष अर्ज भरलेल्या दोन उमेदवारांच्या नावाची शिफारस केली.
भाजपच्या या ऐनवेळच्या शिफारशीवर शिवसेनेचे सभागृह नेते अरुण आशान आणि नाना बागुल यांनी आक्षेप नोंदवला. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर अशाप्रकारे नवीन नावे स्वीकारणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही असे सांगत भाजपची कोंडी केली. त्यावर अंतिम निर्णय घेणे किंवा ती फेटाळणे हा सर्वस्वी सभागृहाचा आणि सदस्यांचा अधिकार असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले. त्यानंतर महापौरांनी तांत्रिक बाजू पुढे करत भाजपच्या दोनच सदस्यांची नावे जाहीर केली. तर तीनचा कोटा असलेल्या शिवसेना आघाडीच्या पाच नावांची घोषणा केली.
विशेष म्हणजे सुरूवातीपासून शिवसेनेने सावधगिरी बाळगत वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी तब्बल २० पेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते. यात शिवसेनेने माजी नगरसेवक रमेश चव्हाण, माजी महापौर पंचम कलानी, भाजपातून आलेले निलेश बोबडे, भाजपच्या पराभूत हेमा पिंजानी आणि वंचितच्या आशा पवार यांची स्विकृत नगरसेवक म्हणून घोषणा झाली. तर भाजपच्या वतीने ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपात आलेले धनंजय बोडारे आणि शिंदेंच्या सेनेतून भाजपात आलेल्या राजेंद्र श्रीखंडे यांची निवड झाली. त्यामुळे स्विकृत निवडणुकीत एक वगळता सर्व आजी माजी शिवसैनिकांच संधी मिळाल्याची चर्चा आहे.
भाजपच्या चार नावांपैकी फक्त दोनच नावे घोषीत करण्यात आली. आमच्या दोन जागांवर दुसऱ्याच उमेदवारांची नावे घोषीत करण्यात आली हे अनधिकृत आहे. हा न्यायालयाचा अवमान आहे. याविरूद्ध आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. – राजेश वधारिया, गटनेता, भाजप.
