उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांनी ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत शहरातील इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थीनींना दरमहा ५०० रुपये दिले जाणार आहेत. त्यापोटी वर्षाला ९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना अर्ज करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार स्व. ज्योती कलानी यांचे नाव देण्यात आले आहे. या नावावरून भाजपने शिवसेनेवर कलानींच्या नावे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. तर पालिका आर्थिक विवंचनेत असतानाही या योजनेची मागणी वा आवश्यकता होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या योजनेंतर्गत महापालिका शाळेतील १९ हजार विद्यार्थींनीना दरमहा ५०० रूपयांप्रमाणे वर्षाला ६ हजार रूपये आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी पालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून वर्षाला जवळपास ९ कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे. मात्र महिला बाल कल्याण विभागासाठी राखीव अर्थसंकल्पातील २६ कोटी रूपयांच्या तरतुदीतून ९ कोटी रूपये केवळ थेट वाटप केल्याने महिला बाल कल्याण विभागातील इतर योजनांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. तसेच या योजनेत फक्त विद्यार्थीनींचाच समावेश असल्याने त्याच वयोगटातील विद्यार्थ्यांच्याबाबत अन्यायाची भावना निर्माण होण्याची भीती आहे.
उल्हासनगर महापालिकेची एकूण आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात कमकुवत होत राहिली आहे. मालमत्ता कराच्या थकबाकीचा डोंगर वार्षिक अंदाजपत्रकाच्या आकड्याला अनेकदा शिवताना दिसतो. पाणी बिलापोटी एमआयडीसी प्रशासनाला सुमारे ११०० कोटी रूपये देणे आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याला सुमारे ३५ कोटींचा खर्च येतो. पालिकेला मिळणाऱ्या योजनांचा निधी, अनुदान यातून शहरात प्रकल्पांची पायाभरणी होते आहे. त्यामुळे एकूणच महापालिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता खरच लाडकी विद्यार्थीनी योजनेची गरज होती का. त्याऐवजी विद्यार्थींनींच्या कौशल्यवर्धनासाठी शाळेतच सामुहिक प्रयत्न करता आले नसते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे अशी कोणतीही मागणी शहरातून यापूर्वी झालेली नव्हती. याबाबत महापौर अश्विनी निकम यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
शालेय साहित्य वाटपाला उशिर
एकीकडे कोट्यावधींची योजना आणि दुसरीकडे याच महापालिकेच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह इतर सुविधा पुरवण्यात शिक्षण विभागाला उशिर झाला होता. त्यावरून पालिकेच्या कारभारावर टीका झाली होती. त्यामुळे महापालिका आणि लोकप्रतिनीधींना खरच विद्यार्थ्यांची काळजी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
ज्योती कलानी ऐवजी सावित्रीबाई फुले नाव द्या
दरम्यान, भाजपने सुरूवातीपासून या योजनेला ज्योती कलानी यांचे नाव देण्याला विरोध केला आहे. यासंदर्भात भाजप शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांचीही भेट घेतली. नाव देण्याचा निर्णय हा एकमताने घेतला नसून त्यावर मतदानही घेतले नसल्याचा आरोप भाजपचे प्रदिप रामचंदानी यांनी केला आहे. तर शिवसेनेतूनही कलानींच्या नावांवर दबक्या आवाजात विरोध असल्याची चर्चा आहे.
असा करता येणार अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थींनींना महापालिकेतील महापौर कार्यालय, गोलमैदान येथील खासदार कार्यालय, महिला व बालकल्याण समिती सभापतींचे कार्यालय, शिक्षण सभापतींचे कार्यालय, सर्व नगरसेवकांच्या कार्यालयात अर्ज करता येईल. तसेच ८८२२१८८२२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन महापौर अश्विनी निकम यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लाभला आमचा विरोध नाही. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असतांना तसेच शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता या सारख्या समस्या कायम असतांना अशा योजना राबविणे योग्य ठरणार नाही.- रोहित साळवे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.
