scorecardresearch

ओमीच्या ‘भीती’ने मुख्यमंत्र्यांची सभेला दांडी

मुंबई, ठाण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी दररोज प्रचारसभांचा धडाका लावला आहे.

urali,phursungi, garbage issue,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उल्हासनगरातील सभा टाळण्यावर भर; कलंकित नेत्याच्या पुत्राला दूर ठेवण्याचा प्रयत्न

मुंबई, ठाण्यासह राज्यभर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिवर्तनाची हाक देत प्रचाराचा धडाका उडवून देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरात प्रचार करणे मात्र टाळले आहे. या ठिकाणी सभा घेतली गेल्यास ओमी कलानी यांनाही सोबत घ्यावे लागेल हे स्पष्ट असल्याने नाहक टीका ओढवून घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर टाळलेले बरे असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे अखेरच्या काही दिवसांत उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभा आयोजनाचे बेत आखणाऱ्या भाजपने हा नाद आता सोडून दिला आहे.

उल्हासनगर महापालिकेत कलंकित नेते पप्पू कलानी पुत्र ओमी यांची साथ करूनये, असा आग्रह भाजपमधील काही जुन्याजाणत्यांनी धरला असताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र कलानी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यास पक्षाला भाग पाडल्याचे एकंदर चित्र आहे. ठाण्यात सुधाकर चव्हाण आणि उल्हासनगर कलानी कुटुंबाशी हातमिळवणी केल्यास त्याचे राज्यभर पडसाद उमटतील, अशी भीती ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि उल्हासनगरमधील भाजपचे जिल्हाप्रमुख कुमार आयलानी यांनी व्यक्त केली होती. असे असताना चव्हाण यांच्या आग्रहामुळे ओमी यांच्यासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही आघाडी नावापुरती असून प्रत्यक्षात ओमी यांचे बहुतांश समर्थक भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. तसेच काहींनी तर प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशेजारी पप्पू यांचे छायाचित्र वापरल्याने मध्यंतरी गहजब उडाला होता. या पाश्र्वभूमीवर उल्हासनगरातील पक्षाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा घेतली जाईल का यासंबंधी गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मुंबई, ठाण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी दररोज प्रचारसभांचा धडाका लावला आहे. उल्हासनगरातही भाजपचा शिवसेनेशी सामना असून येथेही त्यांची सभा घ्यावी, असा आग्रह पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी धरला होता. मात्र, उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा घेतली तर व्यासपीठावर ओमी यांनाही स्थान द्यावे लागेल याची कल्पना आल्याने सभा घेण्याच्या फंदात पडू नये, या मताशी भाजपचे नेते आले आहेत.

दुसऱ्या फळीतील नेते प्रचारात

भाजपकडून दुसऱ्या फळीतील विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांची सभा उल्हासनगरात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजप नव्हे इतर पक्षांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने प्रचार करण्यावर भर दिला असला तरी शिवसेनेकडून युवा सेनेचे आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, रामदास कदम आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. काँग्रेसकडून तूर्तास मोठे नेते प्रचारात उतरणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून माजी पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली असली तरी या पक्षाचे जिल्ह्य़ातील इतर नेते मात्र यान ठिकाणी दिसत नसल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2017 at 02:27 IST