उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना नुकतीच पालिका प्रशासनाने जाहीर केली असून प्रारूप प्रभाग रचना आणि अंतिम प्रभाग रचना यात विशेष बदल झालेला नाही. शहरातील नगरसेवकांची संख्या आता ११ वाढून ८९ वर पोहोचली आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवरून तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत झालेल्या बदलानंतर सिंधी आणि मागासवर्गीयांच्या मतांचे प्राबल्य असलेल्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघांत ६ प्रभाग वाढले आहेत, तर अंबरनाथ आणि कल्यमण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात ४ प्रभागांची वाढ झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या सदस्यांची मुदत ४ एप्रिल रोजी संपुष्टात आली. १ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत अवलंबली गेली होती. मात्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर सध्या उल्हासनगरात तीन सदस्यीय प्रभाग पद्धत राबवली जाते आहे. यापूर्वी उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ सदस्य होते. तर शहरातील प्रभागांची संख्या २० होती. नव्या रचनेनुसार आता महापालिकेत नगरसेवकांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. तर नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार प्रभागांची संख्या ही ३० वर पोहोचली आहे. यातील २९ तीन सदस्यांचे तर एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे. प्रभाग क्रमांक १६ हा दोन सदस्यांचा आहे. १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत या रचनेवर सूचना आणि हरकती नोंदविण्यात आल्या. सूचना आणि हरकतींची संख्या तब्बल ३९४ इतकी होती. २३ फेब्रुवारी रोजी या सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचा कार्यक्रम लांबला होता. अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभार रचनेत विशेष बदल झालेले नाहीत. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
तीन मतदारसंघांत उल्हासनगरची विभागणी
शहरातील एकूण मतदारांची संख्या ५ लाख ६ हजार ९८ इतकी असून त्यात ८६ हजार अनुसूचित जातीची तर ६ हजार ५७६ अनुसूचित जमातीची संख्या आहे. तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये उल्हासनगर महापालिका क्षेत्र विभागले गेले आहे. यात उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असूनही सिंधीतेर नगरसेवकांची संख्या अधिक आहे. या विधानसभा क्षेत्रात पूर्वी १२ प्रभाग होते, मात्र आता त्याची संख्या १८ झाली आहे. या क्षेत्रात आता ५३ नगरसेवक असतील. भाजप, साई पक्ष आणि टीम ओमी कलानी यांचे येथे वर्चस्व आहे. तर कल्याण पूर्व आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांत असलेल्या ८ प्रभागांची संख्या १२ वर गेली आहे. आता ३६ नगरसेवक असतील. मराठीबहुल मतदारांचा हा भाग आहे.