scorecardresearch

उल्हासनगरचे ‘फायरबॉय’ पोलिसांच्या जाळय़ात

लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आणि पाठीराखे वाढवण्यासाठी समाजमाध्यमांवर अश्लील भाषेत आणि धमकीच्या चित्रफिती करून प्रसारित करणाऱ्या दहा जणांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

धमकीच्या आणि अश्लील भाषेतून चित्रफिती तयार करणे महागात

उल्हासनगर : लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आणि पाठीराखे वाढवण्यासाठी समाजमाध्यमांवर अश्लील भाषेत आणि धमकीच्या चित्रफिती करून प्रसारित करणाऱ्या दहा जणांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील एक जण अल्पवयीन आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच आपल्या पोस्ट, व्हिडीओला लाईक आणि फॉलोअर वाढवण्याच्या स्पर्धेत तरुण पिढी कायद्याच्या भाषेत गुन्हा असलेल्या गोष्टी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. जानेवारी महिन्यात ‘थेरगाव क्वीन’ नावाने अकाऊंट असलेल्या तरुणीने अश्लील भाषेतील धमकीचे व्हिडीओ प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला होता. तिला पोलिसांनी अटकही केली होती.

उल्हासनगर शहरातही असाच प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरच्या एका व्हॉट्सअ‍ॅप समूहावर एक चित्रफीत प्रसारित झाला होती. यात काही तरुण हातात बंदूक घेऊन धमकी देत असल्याचे चित्रण होते. याची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी या चित्रफितीतील तरुणांचा शोध घेत यातील काही तरुणांना ताब्यात घेतले असल्याचे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा खात्यांची माहिती काढून त्यातील चित्रफिती पाहिल्या असता यात सातत्याने अश्लील भाषा वापरणे आणि धमक्या देणे या गोष्टी केल्या जात असल्याचे दिसून आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. याप्रकरणी अकाऊंट चालवणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असून यातील अल्पवयीन मुलाची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

गुन्ह्यांची तरुणाईला आवड

आरोपी चित्रफितींमध्ये आणि खात्याच्या नावात हत्येचा कलम ३०२, हत्येचा प्रयत्न कलम ३०७ यांचा सर्रास वापर करत असल्याचे दिसून आले आहे. तुरुंगातून येणार, ठोकणार अशी भाषाही सातत्याने वापरली जाते आहे. शिव्यांना जास्त महत्त्व दिले जात असल्याचेही दिसून आले आहे. फायरबॉय केके३०२, टीम उल्हासनगर ०५, विशाल कुंभार ३०२, मि. अभय गायकवाड ३०२, ३०७, मिकी झेहेन, मलिक भूषण अशी या अकाऊंटची नावे आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ulhasnagar fireboy caught by police through threatening and obscene language ysh

ताज्या बातम्या