उल्हासनगरः कॅम्प ३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असूनही, येथे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. काही दिवसांपूर्वी येथील सिटीस्कॅन यंत्रणा ठप्प असल्याची बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणली होती. त्यानंतर आता मनसेच्या शिष्टमंडळाने थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत रुग्णालयातील गैरसोयींचा पाढा वाचला आहे. रुग्णालयाची अवस्था बिकट झाली असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवण्याची मागणी मनसेने केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात असलेलेय शासकीय मध्यवर्ती रूग्णालय ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह कर्जत, कसारा आणि शहापूर परिसरातील रूग्णांसाठी जीवनदायी आहे. दररोज हजारो गरीब व आदिवासी रुग्ण मोठ्या आशेने या रुग्णालयात येतात. मात्र, येथे आल्यावर त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडते. दर्जोन्नतीनंतरही येथील खाटांची संख्या वाढू शकलेली नाही. अनेकदा रूग्णालयात रूग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागतात. काही दिवसांपूर्वी
रुग्णालयातील सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी यंत्रणा जुनी झाल्याने वारंवार बंद पडत असल्याचे मनसेने समोर आणले होते. त्यावेळी यंत्रांचे सुटे भाग उपलब्ध नसल्याचे कारण रूग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. परिणामी अत्यंत गरीब रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी प्रयोगशाळेत जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.
या आणि रूग्णालयातील इतर अनेक समस्या घेऊन उल्हासनगर मनसेचे शिष्टमंडळ नुकतेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटले. यावेळी रुग्णालयात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. वर्ग-१ मधील मंजूर १६ पदांपैकी तब्बल ९ पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य सेवा गट-अ मधील अनेक पदे भरलेली नाहीत. उपलब्ध असलेल्या डॉक्टरांपैकी काही जण रजेवर किंवा इतरत्र कार्यरत असल्याने बाह्यरुग्ण विभागावर प्रचंड ताण येतो. एका डॉक्टरला शेकडो रुग्ण तपासावे लागत असल्याने उपचाराच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे, हे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
केवळ यंत्रणाच नाही, तर रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे. शौचालयांची दयनीय अवस्था आणि वॉर्डमधील अस्वच्छतेमुळे रुग्ण अधिकच आजारी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच रुग्णालयात मूलभूत औषधांचा साठा नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. यामुळे मोफत उपचारांचा दावा फोल ठरत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
मागण्या नेमक्या कोणत्या
बंद सिटीस्कॅन यंत्रणा दुरूस्त करावी अथवा नवे सिटीस्कॅन यंत्र बसवण्यात यावे. रूग्णालयात हक्काचे एमआरआय तपासणी केंद्र सुरू करावे, ४०० खाट्यांच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देऊन अंमलबजावणी करावी. रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने केल्याची माहिती मनसेच्या बंडू देशमुख यांनी दिली आहे. वेळेत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
