उल्हासनगर: उल्हासनगर शहरात ३१६ धोकादायक इमारतींची यादी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यात ५ इमारती अतिधोकादायक वर्गातील असून त्या तात्काळ रिकाम्या करण्याची गरज आहे. तर ४३ इमारती रिकाम्या करून त्यांची दुरुस्ती करण्याची गरज पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ४४ धोकदायक इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण झालेले नसल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या घटली असून गेल्या वर्षात ३१० इमारती धोकादायक यादीत होत्या.

गेल्या काही वर्षात उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींची पडझड होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले. परिणामी पालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून संरचनात्मक लेखा परीक्षण करण्यावर भर दिला. शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास प्रश्न विविध कारणांमुळे रखडला होता. तो आता मार्गी लागला आहे. मात्र तरीही या काळात शहरात धोकादायक इमारती अस्तित्वात असून त्यात रहिवासी वास्तव्यास आहेत. परिणामी अपघात होण्याची भीती असते. अशा इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण करत त्यांची यादी पालिका प्रशासन जाहीर करते.

हेही वाचा – डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सर्वेक्षण; गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर करडी नजर

उल्हासनगर महापालिकेने नुकतीच शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. या यादीत शहरातील चारही प्रभाग क्षेत्रातील ३१६ इमारतींचा समावेश आहे. यात पाच इमारती अतिधोकादायक वर्गातील आहेत. प्रभाग क्रमांक एक क्षेत्रात एक, प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन आणि प्रभाग क्रमांक चार क्षेत्रात दोन अशा पाच इमारती यात आहेत. या इमारती वास्तव्य करण्यास अयोग्य असून त्या इमारती पाडण्याची गरज आहे. तर ४३ इमारती रिकाम्या करून त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. यात प्रभाग क्रमांक एक क्षेत्रात सात, प्रभाग क्रमांक दोनमध्ये १५, प्रभाग क्रमांक तीनमध्ये १० तर प्रभाग क्षेत्र क्रमांक चारमध्ये ११ इमारतींचा समावेश आहे.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन

यासोबतच रिकामी न करता दुरुस्ती करण्यायोग्य धोकादायक इमारतींची संख्या २०८ इतकी आहे. प्रभाग क्षेत्र क्रमांक एकमध्ये सर्वाधिक ७७ इमारती या प्रवर्गातील आहेत. तर ४४ धोकादायक इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण प्राप्त झाले नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे