उल्हासनगर: शहरांच्या वेशीवर असलेल्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या ग्रामीण भागात नागरी सुविधांची मोठी वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागातील गंभीर समस्यांवर प्रशासनाचा थेट आढावा घेण्यासाठी उल्हासनगरमधील एंटीलिया गुरुद्वारा सभागृहात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. म्हारळ, वरप, कांबा आणि कल्याण ग्रामीण परिसरातील ग्रामस्थांनी या बैठकीत आपल्या प्रलंबित प्रश्नांवरून प्रशासनाला थेट जाब विचारला. रस्ते, पाणी आणि नालेसफाईच्या गंभीर समस्यांमुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बैठकीत प्रशासकीय दिरंगाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
उल्हासनगर महापालिका हद्दीला लागून असलेल्या म्हारळ, वरप आणि कांबा या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातून कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच याच परिसराच्या शेजारून उरण-बडोदे महामार्गही जात आहे. या दळणवळणाच्या सुविधांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून, इथे तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांची घरे आणि गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, एवढा मोठा विकास होऊनही हा परिसर अजूनही ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत येतो.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामपंचायतीच्या निधी आणि अधिकारांना मोठ्या मर्यादा आहेत. त्यामुळे या परिसरात सुसज्ज रुग्णालय, स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावणे यांसारखे मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सुविधांसाठी आवश्यक असलेल्या भूखंडांचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळला होता. यावर सकारात्मक पाऊल उचलत, संबंधित प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जागा लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी दिली.
पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, विस्कळीत पाणीपुरवठा, अपूर्ण राहिलेली नालेसफाई आणि रासायनिक प्रदूषण यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या भागातील रखडलेले विकास प्रकल्प आणि वारंवार उद्भवणाऱ्या समस्या मांडताना, ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा प्रशासन आवश्यक ते गांभीर्य दाखवत नसल्याची थेट चर्चाही बैठकीत रंगली. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनीही बैठकीत ग्रामीण भागातील विविध समस्यांचा पाढा वाचला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. पावसाळ्यापूर्वी अत्यंत आवश्यक असलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
नागरिकांच्या तक्रारी आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना परस्परांमध्ये समन्वय साधण्याचे निर्देश दिले. तसेच प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
प्रतिक्रियाः गेल्या काही दिवसांपासून म्हारळ, वरप, कांबा या ग्रामपंचायतींची बैठकीची मागणी होती. स्थानिकांनी दिलेल्या निवेदनात असलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक प्रकल्प जागेअभावी रखडले असून त्यासाठी तातडीने निर्णय घेणार. काही विषयात एकापेक्षा अधिक विभागांचा समावेश, काही जिल्हा नियोजनात समितीत मार्गी लागतील. – श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे.
