उल्हासनगर : देशामध्ये मानवी हाताने गटार आणि सांडपाणी साफसफाई करण्याला कायद्याने पूर्णपणे बंदी आहे. मात्र उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत २९ जुलै रोजी समता नगर परिसरात एका स्वच्छता कर्मचाऱ्याला थेट उघड्या मॅनहोलमध्ये उतरवून गटार साफसफाई करायला लावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत असून, मानवी हक्क आणि कामगारांच्या सुरक्षेचा संविधानात्मक अधिकार पायदळी तुडवल्याचा आरोप केला जात आहे.
‘द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट, २०१३’ या केंद्रीय कायद्यानुसार स्वच्छता कर्मचाऱ्यांना मानवी टाकाऊ पदार्थ किंवा गटारात उतरवून काम करून घेणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तरीही उल्हासनगर महापालिकेच्या कंत्राटदाराने हा कायदेशीर आदेश धाब्यावर बसवून कामगाराच्या जिवाशी खेळ मांडल्याचा आरोप होतो आहे. उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या मॅनहोलमध्ये एका कामगाराला उतरवण्यात आले होते. या कामात अनेक खडी, वीटा, सिमेंट या भुयारी गटारात पडल्याने कामगाराला उतरवून त्याच्याकडून याची स्वच्छता करण्यात आली, असे सांगण्यात आले आहे.
या प्रकाराची दखल घेत स्वराज्य संघटनेचे जय गायकवाड यांनी थेट उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. ज्या कंत्राटदाराने कर्मचाऱ्याला मॅनहोलमध्ये उतरवले आणि ज्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा अमानवी प्रकार घडला, त्यांच्यावर तातडीने फौजदारी आणि कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच यापुढे शहरातील सर्व नाल्यांची आणि मॅनहोलची सफाई केवळ अत्याधुनिक यांत्रिक उपकरणांद्वारेच केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सफाइ नसून केवळ दगड, वीटा काढण्याचे काम
स्वच्छता कर्मचाऱ्यांशी असा अमानुष व्यवहार होणे ही प्रशासकीय बेफिकिरी आहे, असा संताप स्वराज्य संघटनेने व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून ठोस कारवाई न झाल्यास, स्वराज्य संघटनेच्या वतीने तीव्र लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे. तर मेनहोलमधील भुयारी गटार अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. मात्र या नाल्यात पडलेले दगड आणि वीटा काढण्याचे काम कामगाराकडून केले जात होते. यात कोणताही नियम मोडण्याचा हेतू नाही, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
