उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांच्या फेसबुक खात्यावर त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाची पत्रिका टाकली होती. या पत्रिकेत चक्क महाराष्ट्र उलटा दाखवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत नाराजी व्यक्त झाल्यानंतर अखेर महाराष्ट्र दिनाच्या सायंकाळी आणि कार्यक्रमाच्या आधी ही पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र शहराच्या प्रथम नागरिकाच्या या सोशल मिडीया पोस्टवरून संताप व्यक्त होतो आहे.

शुक्रवार १ मे रोजी राज्यभर महाराष्ट्र दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वनवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पणही आजच पार पडले. समाज माध्यमांवर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचा अक्षरशः पूर आला होता. सर्वच लोकप्रतिनिधी समाज माध्यमांवरूनही नागरिकांशी संवाद साधतात. मात्र हा संवाद साधत असताना अनेकदा चुका होत असतात.

उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांच्या फेसबुक खात्यावरून अशाचप्रकारे एक चुकीची पोस्ट करण्यात आली होती. उल्हासनगर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील ज्ञानेश्वर नगर येथे प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज आर्ट गॅलरी साकारण्यात आली आहे. याचे लोकार्पण १ मे रोजी सायंकाळी होणार होते. या कार्यक्रमाची पत्रिका महापौर अश्विनी निकम यांच्या वतीने त्यांच्या फेसबुक खात्यावर पोस्ट करण्यात आली होती. मात्र या पोस्टमध्ये चक्क महाराष्ट्र उलटा करण्यात आल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे या उलट्या महाराष्ट्राच्या चित्रात स्वतः महापौर अश्विनी निकम यांचे छायाचित्रही होते. महारष्ट्राच्या या उलट्या चित्रावरून समाज माध्यमांवर टीकेची झोड उठवण्यात आली. शहराच्या प्रथम नागरिकाच्या फेसबुक खात्यावर अशा प्रकारे चुकीची आणि अपमानजनक पोस्ट झाल्याने नेटकरी संताप व्यक्त करत होते. अखेर कार्यक्रमाच्या काही तास आधी ही चूक लक्षात आल्यानंतर अश्विनी निकम यांच्या फेसबुक खात्यावरून ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती. मात्र या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात आला होता.