उल्हासनगर : महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व भाजपातील वाद वाढत असतानाच सोमवारी महापौर कमलेश निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महापालिका मुख्यालयात येत जोरदार घोषणाबाजी केली. निकम यांच्यासोबत ४० ते ५० जणांच्या घोळक्याने प्रवेश करीत भाजप सभापतींच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल कमलेश निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती शिवसेनेचे कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह व गंभीर विधान केले होते. या विधानामुळे संतापलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाने उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार कुमार आयलानीसुद्धा उपस्थित होते.

कमलेश निकम यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत एक निवेदन दिले. यावेळी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी निकम यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपने दिला आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली असून, वरिष्ठांनी आदेश दिल्यास आपण आपल्या सभापती पदाचा तत्काळ राजीनामा देऊ, अशी भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी मांडली आहे.

भाजप शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेतल्यानंतर, कमलेश निकम यांनी थेट उल्हासनगर महापालिका मुख्यालयात धडक दिली. यावेळी निकम यांच्यासोबत ४० ते ५० जणांचा घोळका होता. या घोळक्याने मुख्यालयात प्रवेश करत संपूर्ण पालिकेत फेरी मारली. निकम यांच्यासह या घोळक्याने भाजपच्या सभापतींच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी पालिकेला राजकीय पक्षाच्या कार्यालयासारखे स्वरूप आले होते. दरम्यान सर्वसामान्यांना पालिका मुख्यालयात प्रवेश देताना प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी एवढ्या मोठ्या घोळक्याला का रोखले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भाजपच्या काही नेत्यांकडून माझ्या कुटुंबाला शिवीगाळ व धमक्या दिल्या जात आहेत. मला महापालिकेत येऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यामुळे मी आता महापालिकेत आलो आहे, ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी समोर येऊन दाखवावे, असे आव्हान निकम यांनी यावेळी बोलताना दिले. तसेच, आपण रविंद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या आरोपांवर व विधानावर आजही ठाम असल्याचे सांगत निकम यांनी माफी मागण्यास नकार दिला. शिवाय, भाजपच्या नेत्यांकडून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, असा खळबळजनक दावा कमलेश निकम यांनी केला.

या दोन्ही पक्षांच्या आरोप-प्रत्यारोप, धमक्या आणि थेट पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या वादामुळे उल्हासनगर महापालिकेत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.