कल्याण : उल्हासनगरमधील एका इसमाने १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याने कल्याण जिल्हा व सत्र जलदगती न्यायालयाने संबंधित आरोपीला १० वर्ष तुरूंगवास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश पी. पी. मुळ्ये यांनी हा निकाल लावला. तब्बल १६ वर्षांनी या खटल्याचा निकाला लागला आहे.
अझऱ् उर्फ बदू मुस्ताक कुरेशी (३९) असे आराेपीचे नाव आहे. सन २०११ मध्ये अझरने एका १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम ३७६(२) (आय), इंडियन पीन कोडमप्रमाणे न्यायालयाने ही शिक्षा इसमाला ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त पोलीस अभियोक्ता ॲड. व्ही. डी. सोनटक्के, ॲड. सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले. एम. एच. सावंत यांनी आरोपीतर्फे न्यायालयात काम पाहिले.
प्रकरण काय?
अझरने या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. तिला उत्तरप्रदेशातील लखनौ येथे नेऊन तिचे तिथे धर्मांतर करण्यात आले. आणि तिच्याशी नंतर अझर मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले, असे सरकार पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. पीडितेच्या अल्पवयावर प्रतिवादींनी उपस्थित केलेले प्रश्न न्यायालयाने फेटाळून लावले.
न्यायालयाचे निरिक्षण
सरकारी वकील ॲड. सचिन कुलकर्णी यांनी सांगितले, या गुन्हे प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी आणि साक्षीदारांच्या साक्षी या हा गुन्हा सिध्द करण्यास महत्वाच्या ठरल्या.
पीडितेच्या जन्मदाखल्यावरून ती १५ वर्षाची असल्याचे सिध्द होते. त्यामुळे तिच्या वयाच्या विषयावरून याठिकाणी विषय उपस्थित करण्याचा प्रश्न निर्माण होत
नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. तिची कोणतीही संमती न घेता, तिला कसलीही माहिती न देता तिचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले हेही खूप गंभीर आणि दुर्लक्षित करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपीने गुन्हा केल्याचे सबळ पुराव्याने स्पष्ट झाल्याने न्यायालायने अझरला कुरेशीला दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून पीडितेला सहाय्य करण्याच्या सूचना न्यायालयाने सरकार पक्षाला केल्या.
