उल्हासनगर: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरीही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य आणि गणवेश मिळालेले नाहीत. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा फटका गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसत असून, याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेकडे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी उल्हासनगरमध्ये ”भीक मागो” आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला आहे.
नियमानुसार शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे अपेक्षित असते. मात्र जूनमध्ये सुरू झालेल्या शाळांचा आता सप्टेंबर महिना उजाडला आहे. काही दिवसांतच दिवाळीच्या सुट्ट्या लागतील, अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी पालिका प्रशासन केवळ झोपेचे सोंग घेऊन गप्प बसले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीकडे प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
नुकतेच महापालिका शाळांसाठी १७ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. यावरही बंडू देशमुख यांनी सडकून टीका केली आहे. जे सत्ताधारी केवळ इमारतींसाठी निधी आणल्याची जाहिरातबाजी करत आहेत, त्यांना या गोरगरीब मुलांच्या हातात वही-पेन आणि गणवेश नसल्याचे दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वतःच्या कमिशनसाठी मोठे-मोठे टेंडर काढणारे सत्ताधारी व प्रशासन या विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती उदासीन आहेत, हेच यावरून सिद्ध होते, असाही आरोप देशमुख यांनी केला आहे. पालिका शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले शिक्षणासाठी येतात, खाजगी शाळांचा खर्च परवडत नसल्यानेच पालक त्यांना सरकारी शाळेत पाठवतात, याची आठवणही त्यांनी प्रशासनाला करून दिली. महिनाभरांनंतरही ठोस कार्यवाही नाही.
गेल्या महिन्यात मनसेच्या शिष्टमंडळाने या प्रश्नावर मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यावेळी आयुक्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत गंभीर असल्याचे वाटले होते. मात्र, आज महिना उलटूनही कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे आयुक्तांचे गांभीर्य केवळ निवेदन स्वीकारण्यापुरतेच मर्यादित असते का, असा सवाल मनसेने विचारला आहे.
आंदोलनातून जमा झालेला निधी प्रशासनाला देणार
पालिका प्रशासनाकडे विद्यार्थ्यांना साहित्य देण्यासाठी पैसे उरले नसल्याची शक्यता वर्तवत, मनसे आणि मनविसेच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी शहरात भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातून जमा होणारा निधी पालिका प्रशासनाला सुपूर्द केला जाईल, असे मनसेने स्पष्ट केले आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह मनविसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, जिल्हा संघटक कल्पेश माने, उपजिल्हाध्यक्ष अशोक गरड, मनविसे शहराध्यक्ष अमोल पाटील आणि श्लोक बेंडके उपस्थित होते.
