राज्य सरकारमध्ये एकमेकांचे ‘मित्र’ असलेल्या भाजप आणि शिवसेनेत उल्हासनगरच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी जबरदस्त चुरस आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. सदस्यांच्या संख्येत भाजपची बाजू वरचढ असली तरी आमचाच महापौर होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे ५ एप्रिल रोजी होणाऱ्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत ओमी कलानी गटाशी जुळवून घेतल्याने ही निवडणूक चर्चेत आली होती. यावरून विरोधी पक्षांकडून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमारही केला होता. मात्र, निवडणुकीत भाजपला ओमी कलानी गटाच्या मदतीने ३३ जागा जिंकता आल्या. बहुमतासाठी ३९ जागांची गरज आहे. त्यामुळे भाजपने ११ जागा जिंकणाऱ्या साई पक्षाला गळाला लावले आहे. शिवाय अन्य दोन अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला असून त्यांचे संख्याबळ ४६ वर गेले आहे. त्या जोरावर भाजपने महापौरपदासाठी जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी आणि उपमहापौरपदासाठी साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनेही साई पक्षाला महापौरपदाची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर आपल्याला आवडली नाही, असे सांगून साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी यावेळी शिवसेनेला आपण गांभीर्याने घेतले नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. दुसरीकडे शिवसेनेचे या निवडणुकीत २५ नगरसेवक निवडून आले असून, राष्ट्रवादीच्या ४, रिपाईच्या २ आणि काँग्रेसच्या एका नगरसेविकेने विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ३२ वर गेले असून आणखी ७ नगरसेवकांची बहुमतासाठी गरज पडणार आहे. मात्र तरीही शिवसेनेने महापौरपदासाठी ज्योती माने आणि उपमहापौरपदासाठी रिपाईच्या भगवान भालेराव यांचा अर्ज दाखल केला आहे. यानंतर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महापौर आमचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ५ एप्रिलला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उल्हासनगर महापालिका ही ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची महापालिका आहे. त्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात उल्हासनगर शहर येते. त्यामुळे उल्हासनगरमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू आहे. उल्हासनगरची सत्ता हातून गेली तर पुढील लोकसभा निवडणूक शिंदे यांना जड जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.