उल्हासनगरः उल्हासनगर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेची पुरती दुरावस्था झाली असून त्यामुळे शहरात २८ टक्क्यांपर्यंत पाणी गळती आहे. यात चोरीच्या अनधिकृत जलवाहिन्यांची संख्याही मोठी आहे. शहरातील काही पाणीचोरांनी थेट जलकुंभात पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांवर अनधिकृत नळजोडण्या केल्या होत्या. या नळजोडण्या आता तोडण्याच्या कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. किचकट अशा या कारवाईत एका दिवसात दोन नळ जोडण्यात तोडण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवघ्या १३ चौरस किलोमीटर क्षेत्रात उल्हासनगर शहरात पाच लाख लोकसंख्या राहते. त्यामुळे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात पालिकेचा कस लागतो. शहरात पाण्याची गळती २८ टक्क्यांपर्यंत असल्याचा खुद्द पालिकेचाच दावा आहे. उल्हासनगर शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. शहराला दररोज १४० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पाण्याची गळती आणि चोरीमुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरात अनधिकृत जोडण्यांची संख्या वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मदतीने नागरिक या नळजोडण्या करतात, असा आरोप होतो. यात खासगी जोडारीला बोलवले जाते. त्याच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणी जोडण्या केल्या जातात. सहसा रात्रीच्या  वेळी या जोडण्यांची कामे केली जातात. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर अशा अनधिकृत नळजोडण्या आहेत. त्यासोबत आता काही पाणी चोरांनी थेट जलकुंभात पाणी नेणाऱ्या जलवाहिनीवरच चोरीच्या नळजोडण्या घेतल्याचे समोर आले आहे. या नळजोडण्यांमुळे जलकुंभात पुरेसे पाणी गोळा होत नाही. त्यामुळे त्या जलकुंभावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अशा मोठ्या जलवाहिन्यांवरच्या नळजोडण्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कारवाई सुरू केली आहे. बुधवारपासून पंजाबी कॉलनी परिसरात उल्हासनगर महापालिकेने या कारवाईला सुरूवात केली. गुरूवारीही ही कारवाई सुरू होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही कारवाई वेळखाऊ आणि किटकट असून आतापर्यंत या कारवाईत तीन मोठ्या नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar municipal corporation action on unauthorized tap connections zws
First published on: 30-06-2022 at 15:41 IST