उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत वादाचा नवा अंक पुन्हा पाहायला मिळाला. सोमवारी स्वीकृत सदस्य निवडणूक महापौरांच्या आदेशाने स्थगित केल्याने भाजपाने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महापौर अश्विनी निकम यांच्या जनता दरबारात भाजप पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. पुढे शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे.
उल्हासनगर महापालिकेत निवडणुकीपूर्वीपासूनच शिवसेना आणि भाजपात थेट सामना होता. मात्र पुढे निकालानंतर अपरिहार्यता म्हणून उल्हासनगरात शिवसेना आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. संख्याबळाच्या आधारे शिवसेनेला महापौर पद मिळाले तर भाजपला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागले. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत आलेले कलानी गट आणि भाजप यांच्यात विस्तवही जात नाही. त्यामुळे त्याचे पडसाद या सत्तेत वारंवार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी महापौरांचे पती कमलेश निकम यांनी स्थानिक भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यावर टीका केल्याने भाजपने असहकार पुकारला होता. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने वातावरण काही अंशी शांत झाले होते.
त्यातच स्वीकृत सदस्य निवडीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना भाजपातील वाद उफाळून आला आहे. सोमवारी स्वीकृत सदस्य निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख होती. मात्र नेमकी त्याच दिवशी आयुक्तांनी ही निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले. यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी महापौरांच्या पत्राचा दाखला दिला. त्यानंतर भाजपच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची तात्काळ भेट घेतली. या भेटीत महापौर यांचा निर्णय कसा कायदेशीररित्या चुकीचा आहे, हे त्यांनी दाखवून दिले.
यावेळी बोलताना भाजप गटनेते राजेश वधारीया यांनी याबाबत आम्ही कायदेशीर सल्लाही घेत आहोत. हा निर्णय आम्हाला विश्वासात न घेता घेतला गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कायदेशीर प्रश्न उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे शिवसेनेचे सभागृह नेते अरुण आशान यांनी स्पष्ट केले.
जनता दरबारात गोंधळ
भाजपचे इच्छुक सदस्य अर्ज भरण्यासाठी महापालिकेत दाखल झाले होते. मात्र अचानक आलेल्या निर्णयामुळे त्यांचा हिरमोड झाला. त्यांनी या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला. त्याचे पडसाद काही तासात पाहायला मिळाले. उल्हासनगर कॅम्प तीन मध्ये महापौर अश्विनी निकम यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात भाजपचे बाळा श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि इतर पदाधिकारी दाखल झाले. त्यांनी पाणी प्रश्नावरून महासभा का आयोजित केली जात नाही असा प्रश्न करत जनता दरबारात महापौरांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहतच महापौर अश्विनी निकम यांनी जनता दरबारातून काढता पाय घेतला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्ष सुरू असल्याचे चित्र दिसत होते. विशेष म्हणजे यापूर्वीच्या पहिल्या जनता दरबारातही अशाच प्रकारे गोंधळ झाला होता.
याबाबत महापौर अश्विनी निकम यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. मात्र शिवसेनेतर्फे त्यांचे पती कमलेश निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका आम्हाला बसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पक्षात नाराजी आहे त्यामुळे कार्यकर्ते चिडलेले आहेत. भाजप स्वतः सत्तेत असताना ते आंदोलन कसे काय करू शकतात. त्यांनी सत्य बाहेर पडावे आणि मग आंदोलन करावीत अशी प्रतिक्रिया कमलेश निकम यांनी दिली.
तर, कलानी गटातून शिवसेनेत झालेले लोक शिवसेना आणि भाजप पक्षांतील युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे राजेश वधारीया यांनी दिली.
