उल्हासनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन आणि विविध कामगार संघटनांमध्ये बोनसच्या रकमेवरून निर्माण झालेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. महापौर अश्विनी निकम यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांच्या दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा तिढा सुटला असून, यंदा कर्मचाऱ्यांना १८ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर हा वाद मिटल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वाढत्या महागाईमुळे यंदाच्या दिवाळीत सानुग्रह अनुदानात घसघशीत वाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची आणि संघटनांची रास्त अपेक्षा होती. यासाठी लेबर फ्रंट, म्युनिसिपल लेबर युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी कामगार सेना आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या प्रमुख संघटनांनी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली होती. तर, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने एक पाऊल पुढे टाकत २८ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची भूमिका घेतली होती. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत महापालिकेच्या नाजूक आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत, प्रशासनाने गतवर्षीप्रमाणेच यंदाही केवळ १८ हजार रुपये बोनस देण्याची भूमिका घेतली. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ऐन दिवाळीत हा बोनसचा प्रश्न चिघळून संपाचे हत्यार उपसले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
बोनसच्या वादावर आता पडदा
महापौर अश्विनी निकम यांनी प्रशासन आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये समन्वय साधत मध्यस्थी केली. दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर संघटनांच्या मागणीचा मान राखत प्रशासनाने आधीच्या १८ हजार रुपयांत ५०० रुपयांची वाढ देण्याचे मान्य केले. त्यानुसार यंदाच्या सानुग्रह अनुदानाचा आकडा १८ हजार ५०० रुपयांवर निश्चित करण्यात आला. कामगार संघटनांनी केलेल्या २५ ते २८ हजार रुपयांच्या मागणीच्या तुलनेत ही ५०० रुपयांची वाढ अत्यंत तुटपुंजी आणि अल्प असली तरी, दिवाळीच्या तोंडावर हा तिढा सुटणे महत्त्वाचे होते. त्यामुळे या निर्णयावर कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत तोडगा काढल्याबद्दल महापौर अश्विनी निकम यांचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे उल्हासनगर महापालिकेतील बोनसच्या वादावर आता पडदा पडला आहे.
