उल्हासनगरः निवडणुकीत एकमेकांविरूद्ध आरोपांची राळ उठवणारे शिंदेंची शिवसेना आणि भाजप अखेर उल्हासनगरात सत्तेसाठी एकत्र आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने कलानी गटातील शिवसेना चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या अश्विनी निकम यांना महापौरपदासाठी तर भाजपच्या वतीने अमर लूंड यांना उपमहापौर पदासाठी संधी देण्यात आली आहे. सत्तेचे समसमान वाटप केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपसोबत न जाण्यासाठी शिवसेनेसोबत आलेले वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षाच्या पदरात काय पडणार याविषयी तर्कवितर्त लढवले जात आहेत. कॉंग्रेस वगळता सर्वच पक्ष एकत्र आल्याने विरोधी पक्ष अवघ्या एका नगरसेवकापुरता उरला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी शुक्रवारी अर्ज भरण्यात आला. या पालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकमेकांविरूद्ध लढले होते. भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढवून शिवसेनेला घाम फोडला होता. शिंदेंच्या शिवसेनेने कलानी गट, साई पक्ष, रिपाई, पीआरपी या पक्षांना सोबत घेत निवडणूक लढवली. त्यानंतरही त्यांना अवघ्या ३६ जागांवर समाधान मानावे लागले.

साई पक्षाने एक तर भाजपने ३७ जागा जिंकल्या. त्यामुळे सत्तेचे गणित जुळवण्यासाठी ४० जागांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी आणि एका अपक्षाला सोबत घेतले. हे गणित जुळवताना त्यांनी वेगाने हालचाली केल्याने शिवसेना एकहाती सत्ता स्थापन करणार का अशी चर्चा रंगली. मात्र शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीने महापौर पदासाठी अश्विनी कमलेश निकम तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या वतीने अमर लुंड यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत आता सर्व काही पक्ष सत्तेत आले आहेत. सत्तेच्या एकूण नगरसेवकांची संख्या ७ ८ पैकी ७७ एवढी झाली आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडून बिनविरोध झाल्यात जमा झाल्याची चर्चा रंगली आहे. अर्ज दाखल करतेवेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, डॉ. बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे, पप्पू कलानी, जीवन इदनानी, अरूण आशान तसेच शिवसेना, भाजप, रिपाई, साई पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सत्तेचा पहिला मान कलानींना

उल्हासनगर महापालिकेत तब्बल ९ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर महापौर पदाची पहिली संधी टीम ओमी कलानी गटाला मिळाली आहे. कलानींचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय मानले जाणारे कमलेश निकम यांच्या पत्नी अश्विनी निकम यंदा प्रभाग सातमधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या. त्यांना महापौरपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निमित्ताने सत्तेचा पहिला मान कलानी गटाला मिळाल्याचे बोलले जाते.