उल्हासनगरः करवसुलीत सासत्याने अपयशी ठरणाऱ्या उल्हासनगर महापालिकेला यंदाच्या वर्षातही करवसुलीत विशेष कामगिरी करता आलेली नाही. यंदा पालिकेने एकूण ७६ कोटी ६० लाख रूपयांची करवसुली केली. त्यातील ४८ कोटी ८२ लाख हा चालु वर्षातील कर होता. तर २९ कोटी ७८ लाख थकबाकी होती. त्यामुळे चालु कराच्या एकूण ८६ कोटी मागणीच्या अवघे ५४.४४ टक्के मालमत्ता करवसुलीत पालिकेला यश आले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पालिकेने ११४.१० कोटी करवसुलीचे लक्ष्य ठेवले होते.

व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर महापालिका क्षेत्रात दररोज कोट्यावधी रूपयांचे व्यवहार आणि उलाढाल होते. मात्र असे असले तरी उल्हासनगर महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा भाग असलेल्या मालमत्ता कराची थकबाकी थेट ८०० कोटींवर आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला मालमत्ता कराच्या पोटी ८११ कोटी थकबाकी येणे बाकी होते. सोबतच चालु वर्षाची कराची मागणी ही ८६ कोटींची होती. पालिकेने नागरिकांनी कर भरणा करावा यासाठी अभय योजना जाहीर केली होती. तर त्यांचे प्रबोधन करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यासाठी पालिकेने एका संस्थेची नियुक्तीही केली होती.

मात्र त्यानंतरही उल्हासनगर महापालिकेला ३१ मार्च अखेरीस अवघे ७६ कोटी ६० लाख ६७ हजार २३४ रूपये मालमत्ता कराची वसुली करता आली आहे. या एकूण वसुलीत थकबाकीचा वाटा ३८ टक्के आहे. तर उर्वरित रक्कम चालू मालमत्ता करातील आहे. यंदाच्या २०२५-२६ या वर्षात मालमत्ता कराची चालू मागणी ८६ कोटी होती. त्यापेकी ४६ कोटी ८२ लाख ३१ हजार ९०९ रूपयांची वसुली करण्यात आली. अर्थात अवघी ५४.४४ टक्के चालु कराची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. तर थकबाकी ८११ कोटी होती. त्यापैकी अवघे २९ कोटी ७८ लाख ३५ हजार ३२५ रूपये थकबाकी वसूल करण्यात पालिकेला यश आले. अर्थात एकूण थकबाकीपैकी अवघे ३.६७ टक्के वसुली करण्यात यश आले आहे. त्यामुळे पालिकेची थकबाकी पुन्हा एकदा वाढणार आहे.

लक्ष्य अपूर्णच

उल्हासनगर महापालिकेतील एकूण मालमत्ता धारकांपैकी तब्बल १ लाख ३० हजार मालमत्ताधारक हे थकबकीधारक होते. गेल्या २०२५-२६ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार पालिकेने मालमत्ता करातून

११४.१० कोटींची करवसुलीचे लक्ष्य ठेवले होते. मात्र पालिका अवघ्या ७६ कोटींवर येऊन थांबली. २०२६-२७ या आर्थिक वर्षात पालिका प्रशासनाने तब्बल १३९.१० कोटी मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे पूर्वातिहास पाहता या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी पालिका प्रशासन काय पाऊले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.