scorecardresearch

उल्हासनगरात पालिका उभारणार संक्रमण शिबीर; १२ इमारतीत २७० सदनिकांचा प्रस्ताव, २० कोटींचा खर्च

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  पालिकेच्या मागणीनंतर तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे.

transition camp in Ulhasnagar
उल्हासनगर पालिका

उल्हासनगरः उल्हानगर शहरात धोकादायक इमारती कोसळण्याच्या  घटना घडून अचानक बेघर होणाऱ्या रहिवाशांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पर्याय नाही. त्यामुळे अशा आपत्तीकाळात शहरातील नागरिकांना पर्यायी निवारा देण्यासाठी उल्हासनगर महापालिका  क्षेत्रात संक्रमण शिबीर उभारले जाणार आहे. १२ इमारतींमध्ये २७० सदनिका उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  पालिकेच्या मागणीनंतर तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील उंबर्डे येथील कचराभूमीवरील सुरक्षारक्षकांना गुंडांची मारहाण

निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून उभ्या केलेल्या आणि उल्हासनगर नगरपरिषद असताना केलेल्या कारवाईतील कोणत्याही स्थापत्य संरचना अहवालाशिवाय पुन्हा वापरात आणलेल्या इमारती उल्हासनगर शहरात धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींची संख्या मोठी असून या इमारती कोसळण्याच्या घटना गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. या इमारतींमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक इमारत कोसळल्यानंतर त्या इमारतीतील असंख्य कुटूंब अचानक बेघर होतात. त्यातील बहुतांश आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे आश्रय घेतात. ज्यांना अशी व्यवस्था नसते ते उल्हासनगर शहरातील आश्रम किंवा  दरबारमध्ये स्थलांतरीत होतात. अशा बेघर नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेकडे कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना घर मिळेपर्यंत पर्याय उपलब्ध व्हावा येहेतूने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर महापालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे मागणी केली होती. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेने त्याचा सविस्तर  प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर केला होता. त्यासाठी २० कोटी रूपयांची आवश्यकता होती. हा  प्रस्ताव जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याला आता मंजुरीमिळाल्याची माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये दुचाकीच्या धडकेत गर्भवती महिला, बालिका जखमी

१२ इमारती २७० सदनिका उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात मासळी  बाजाराशेजारी वाल्मिकी नगर येथे हे संक्रमण शिबीर उभारले जाणार आहे.  यात १२ इमारतींचा प्रस्ताव  असून त्यात २७ सदनिका उपलब्ध होणार आहेत. आपत्ती काळात तसेच शहरातील सर्वात मोठी समस्या असलेल्या धोकादायक इमारतींच्या पडझडीच्या घटनांनंतर या संक्रमण शिबिराचा फायदा होईल.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 14:27 IST
ताज्या बातम्या