उल्हासनगर: शहरातील झोपडपट्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खासगी शाळांचे महागडे शुल्क परवडत नसल्यामुळे इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निर्णयामुळे आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आता पहिली ते चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास शासनाकडून अधिकृत मंजुरी मिळाली असून, भविष्यात आठवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
उल्हासनगर हे बहुभाषीक शहर आहे. यात सिंधी बांवधांची संख्या मोठी असली तरी मराठी, हिंदी, पंजाबी, उर्दू, गुजराती भाषिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरात पालिकाही तीन भाषांमधून शिक्षण देणाऱ्या शाळा चालवते. उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत एकूण पालिका संचलित २१ शाळा आहेत. त्या सुमारे साडे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १०० हून अधिक शिक्षक त्यांना शिक्षण देत आहेत. पालिकेच्या एकूण शाळांमध्ये ८ शाळा मराठी, १२ शाळा हिंदी तर एक शाळा गुजराती आहे. सिंधीबहुल शहरात एकही सिंधी भाषीक शाळा नाही. तर एकही इंग्रजी शाळा नाही.
शहरातील गोरगरीब आणि होतकरू मुलांनाही इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उल्हासनगर महापालिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता पालिका शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण विभागाची मंजुरी मिळाली आहे. नगरसेवक दुर्गा राय यांनी यावर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या महासभेत पालिका शाळांमध्ये इंग्रजी माध्यमासह माध्यमिक शिक्षण सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव महासभेत सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर, महापौर अश्विनी निकम यांनी स्वतः राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण संचालक ए. गोसावी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी आग्रही पाठपुरावा केला होता.
त्यानंतर नुकतीच या मागणीला सरकारचीही मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या सात शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी महापालिकेच्या शाळा क्रमांक ८, ११, १३, १४, २२, २४ आणि २७ या शाळांचा विचार प्राधान्याने करण्यात येत आहे. सध्या उल्हासनगर महापालिकेच्या शाळांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच मर्यादित आहे. मात्र, या नव्या निर्णयामुळे आणि मंजुरीमुळे, आता पालिका शाळांमध्ये आधी आठवीचे वर्ग सुरू करून टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा विस्तार करण्याचे नियोजनही महापालिकेने आखले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना आता नवी भरारी मिळणार आहे.
