उल्हासनगर: उल्हासनगरमधील अमराठी रिक्षाचालकांनी नुकतेच मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनातून आणि व्यवसायातून वेळ काढून मराठी शिकण्याची जिद्द दाखवणाऱ्या या रिक्षाचालकांसाठी रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला होता. या “महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!” या मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाची यशस्वी सांगता नुकतीच एका उत्साहपूर्ण प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने झाली.
उल्हासनगर शहरात बहुतांश अमराठी भाषिक रिक्षाचालक आहेत. सिंधी, उत्तर भारतीय अशा रिक्षा चालकांची संख्या अधिक आहे. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये आणि राज्याची राजभाषा असलेल्या मराठीचा त्यांना आदरपूर्वक वापर करता यावा, या उद्देशाने अमराठी भाषकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबविण्यात आले.
महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणांतर्गत अमराठी रिक्षाचालकांना संवादासाठी आवश्यक असलेले प्राथमिक मराठी भाषेचे ज्ञान, व्याकरण आणि शुद्धलेखनाचे धडे देण्यात आले. अनेक रिक्षाचालकांनी आपल्या व्यवसायातील वेळ काढून अत्यंत उत्साहाने या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणार्थी रिक्षाचालकांच्या वेळेचा आणि मराठी शिकण्याच्या जिद्दीचा सन्मान करण्यासाठी एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान आणि राजेंद्र चौधरी यांसारख्या प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रिक्षा चालक-मालकांना प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, या संपूर्ण प्रशिक्षण उपक्रमात मोलाचे योगदान देणारे केंद्र संचालक प्रकाश माळी, केंद्र प्रमुख प्रहलाद कोळते यांच्यासह निखिल पाटील, प्रमोद पांडेय, राहुल जैन आणि डॉ. गोविंद गायकवाड या प्रशिक्षकांचाही यावेळी रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्यापासून ते त्यांना हे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यापर्यंत रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदर सिंह (विक्की) भुल्लर यांनी विशेष पुढाकार घेतला होता. याबद्दल उपस्थित सर्व रिक्षा चालक-मालकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
