उल्हासनगरः उल्हासनगरातील धोकादायक इमारतींच्या पाडकामादरम्यान तिचे उर्वरित दोन मजले अचानक असंतुलित होऊन शेजारील घरांवर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील पंचमुखी ही चार मजली इमारत होती. या ढिगाऱ्याखाली तीन नागरिक अडकले होते. मात्र, अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून एक मोठी जीवितहानी टळली आहे. उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वीही पाडकाम करत असताना इमारत कोसळल्याची घटना घडली होती.

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर बनला आहे. तीन दशकांपूर्वी उल्हासनगर शहरात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून अनेक इमारती बांधण्यात आल्या होत्या. या इमारती परवानगीविना उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे या अनधिकृत इमारतींवर यापूर्वीच कारवाई झाली होती. त्यावेळी अनेक इमारतींचे स्लॅब तोडण्यात आले होते. मात्र काहींनी स्लॅब पुन्हा जोडून त्याचा वापर सुरू केला होता. मधल्या काळात हेच स्लॅब कोसळण्याचे प्रकार घडल होते. मात्र काही महिन्यांपूर्वी या इमारतींवरचा अनधिकृत शिक्का पुसून त्या नियमानुकूल करण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. मात्र यातील अनेक इमारतील अतिधोकादायक प्रकारात आहेत. त्या पाडण्याचे कामही केले जाते.

उल्हासनगर महानगरपालिकेकडून कॅम्प तीन परिसरात असलेली पंचमुखी ही चार मजली इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्यानुसार तिच्या पाडकामाची कारवाई सुरू होती. यंत्रसामग्रीच्या सहाय्याने इमारतीचे वरचे दोन मजले सुरक्षितपणे पाडण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री पाडकाम सुरू असतानाच उर्वरित दोन मजल्यांचा भाग अचानक कोसळला. हा भलामोठा ढिगारा थेट शेजारी असलेल्या घरांवर आदळल्याने प्रचंड आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

इमारतीचा भाग कोसळल्याने लगतच्या घरात असलेले तीन नागरिक ढिगाऱ्याखाली अडकून पडले. घटनेची गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगारा उपसण्याचे काम हाती घेतले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिन्ही नागरिकांना कोणतीही गंभीर इजा न होता सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पाडकाम करताना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना आणि काळजी घेतली गेली होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची महापालिका प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.